नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राज्यातील विविध जिल्ह्यात (District) काही हिंदू संघटना व बांधवांकडून सणासुदीच्या काळात कत्तलखाने व मांसविक्री (Slaughterhouses and Meat Sales) बंद ठेवण्याची मागणी करत प्रशासनाला निवेदन दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट रोजी राज्यातील मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ( Malegaon and Chhatrapati Sambhajinagar) महापालिकेने कत्तलखाने व मांसविक्री बंदीचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता नाशिक महापालिकेने देखील स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंदीचा निर्णय घेतला आहे.
नाशिक महापालिकेचे (Nashik NMC) पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे यांनी महापालिका आयुक्त मनीषा खत्रींच्या आदेशानुसार हा आदेश काढला आहे. त्यामध्ये, “नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील तमाम नागरीकांना कळविण्यात येते की, “मा. शासनाच्या निर्देशानुसार शुक्रवार, दिनांक १५/०८/२०२५ रोजी “स्वातंत्र्य दिन” असल्याने सदर दिवशी नाशिक महानगरपालिका हद्दीतील कत्तलखाने बंद ठेवण्यात येतील व सदर दिवशी नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात जनावरांची कुणीही कत्तल करू नये. या दिवशी जनावरांची कत्तल करतांना आढळुन आल्यास संबंधीत इसमांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी”, असे म्हटले आहे.

दरम्यान, शहरात (City) सुमारे एक हजार मांस, मासळी विक्रीची दुकाने आहेत. स्वातंत्र्यदिनी मांसविक्री बंद ठेवण्याची मागणी केली जात होती. किंबहुना राज्यातील काही महापालिकांनी स्वातंत्र्यदिनी (Independence Day) मांसविक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता नाशिक महापालिकेने १९८८ च्या शासन नियमाचा आधार घेऊन केवळ कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.




