नाशिक | प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेने विना परवानगी सुरु केलेल्या सांडपाणी प्रक्रिया आणि देखभालीसाठीच्या निविदा प्रक्रियेस त्वरित स्थगिती द्यावी, अन्यथा विधानसभेत लक्षवेधी मांडली जाईल, असे पत्र शिवसेनेचे आ. सुहास कांदे यांनी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांना दिले आहे. दोनच दिवसांपूर्वी महानगराप्रमुख प्रवीण तिदमे यांनी याबाबतची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
२०२७ मध्ये नाशिकमध्ये भव्य स्वरुपात कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेने नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्रे (एसटीपी) बांधण्याचे आणि जुन्या प्रकल्पांचे अद्ययावत करण्याचे नियोजन केले आहे. त्याचा अंदाजे प्रकल्प खर्च पंधराशे कोटीपर्यंत आहे. या प्रकल्पाची निविदा सूचना प्रकाशित करण्यात आली आहे. विशिष्ट ठेकेदारालाच ही निविदा देण्यासाठी निविदा प्रक्रियेत नियम धाब्यावर बसवत निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
ही निविदा प्रक्रिया तातडीने स्थगित करण्यात यावी किंवा रद्द करण्यात यावी. निविदा प्रक्रियेत निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात यावे. जागतिक स्तरावरील कंपन्यांनाही सहभाग घेण्याची आणि जॉईंट व्हेंचरद्वारे निविदा प्रक्रियेत सहभागाची संधी उपलब्ध करून देण्यात यावी. सर्व पात्र बोलीदारांना समान संधी मिळेल सार्वजनिक हित आणि खर्च कार्यक्षमतेचे पालन करण्याची खात्री करावी. नमामि गंगेसारख्या योजनांअंतर्गत केंद्रीय निधीसाठी पात्रता राहील, याची खात्री करण्यात यावी. निविदा विशिष्ट ठेकेदारासाठी राबवली जात असून ती रद्द करा करावी, असे आ. कांदे यांनी पत्रात नमूद केले आहे.
मलनिस्सारण प्रकल्पासाठी राबवलेली निविदा विशिष्ट ठेकेदारासाठी राबवल्याचा संशय आहे. ती रद्द करावी. अन्यथा विधानसभेत लक्षवेधी मांडली जाईल, असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी दिला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा