नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक महापालिका (Nashik NMC) देत असलेल्या नागरी सुविधा व तसेच झालेल्या विकासकामांचे सर्वेक्षण करण्यासाठी मनपाच एक स्वतंत्र पॅनल तयार करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महासभेवर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. विकास आराखड्यातील झालेली व होऊ घातलेली विकासकामे यांचे सर्वेक्षण करुन त्यात सुसूत्रता आणणे हा उद्देश ठेवून पॅनल तयार करण्यात येत आहे.
महापालिकेचे विकास आराखड्यानुसार (Development Plan) कार्यक्षेत्र सुमारे २६७.४८ चौ.कि.मी. असून नागरी विकास झपाट्याने होत आहे. मनपाकडून विकासकामांमध्ये इमारती, रस्ते, पदपथ, शाळा, क्रीडांगण, दवाखाने, उद्याने, पार्क, तरणतलाव, स्मशानभूमी, दफनभूमी, गटारी, पाइपलाइन, सिवेज ट्रिटमेंट प्लैट, वॉटर ट्रिटमेंट प्लॅट, पाण्याच्या टाक्या या बाबींचा समावेश होतो.
तसेच, खासगी जमिनींचे विकास आराखड्यानुसार जमीनमालक अथवा विकास मार्फत अभिन्यासांचे विकसन होऊन नवीन नागरी वस्ती तयार होत असते. विकासकामे व सुविधा देण्यासाठी अस्तित्वातील स्थितीचे तसेच विकास आराखड्यानुसार प्रस्तावित प्रयोजनांचे पूरक व आवश्यक रेखांकन नकाशे तयार करणे, मोजमाप व सर्वेक्षणाची कामे करावी लागतात. त्यासाठी महापालिका सर्वेक्षण (Survey) पॅनल गठित करणार आहे. त्यासाठी सर्वेक्षकास विकास आराखडाविषयक, जमीन मोजणी, आदी कायदेविषयी माहिती असावी.
अनुभवी, कुशल तांत्रिक मनुष्यबळ
एजन्सीकडे सर्वेक्षण काम करणेसाठी अनुभवी, कुशल तांत्रिक मनुष्यबळ असावे अद्ययावत तांत्रिक उपकरणे असावीत. या प्रमुख अर्टी, शर्ती असून त्यात जी संस्था पात्र ठरेल, तिचा पुढील पाच वर्षांसाठी पॅनलमध्ये समावेश केला जाणार आहे. नकाशा प्रमाणित करणे व आरक्षित क्षेत्रानुसार जागेवर डिमार्केशन, डी. पी. रस्त्यात जाणारे क्षेत्र निश्चित करणे, संरेषा निश्चित करणे व डिमार्केशन करणे. डी. पी. रस्त्यात तसेच आरक्षणाखाली जाणाऱ्या क्षेत्राचा तपशील निश्चित करून टीडीआर देणे कामी सर्वेक्षण नकाशा तयार करणे, डीपी रिपोर्टमध्ये दर्शविल्यानुसार आरक्षण क्षेत्राची मोजणी करणे, क्षेत्र निश्चिती करणे, भूसंपादन करण्यासाठी प्रस्ताव तयार करणे, मनपामार्फत भूमी अभिलेख खात्याकडून संयुक्त मोजणी करणे आदी कामांचा समावेश राहणार आहे, कामाच्या पूर्णतेवर व प्राथमिक नकाशे सॉफ्ट व हार्ड कॉपी सादर केल्यावर सत्तर टक्के व कामाच्या पूर्णतवर व अंतिम नकाशे सादर केल्यावर उर्वरित तीस टक्के शुल्क अदा केले जाईल.