पेठ | वार्ताहर | Peth
महाराष्ट्र ते गुजरात (Maharashtra to Gujarat) या दोन राज्यांना जोडणाऱ्या नाशिक-पेठ राष्ट्रीय महामार्ग (Nashik-Peth Highway) एनएच क्रमांक ८४८ वर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. या महामार्गावरील वापी येथे गुजरात औद्योगिक वसाहत असल्याने प्रवाशांच्या वाहतुकीबरोबरच महाकाय यंत्रसामुग्री घेऊन जाणारी अवजड वाहने यावरून जातात. मात्र, आता या राष्ट्रीय महामार्गाची दैनावस्था झाल्याने नागरिकांकडूनच रस्ता दुरूस्ती केली जात आहे.
या मार्गावरील सावळ व कोटंबीघाट (Sawal and Kotambighat) ही एकूण ८ किमी अंतराची धोकादायक वळणे असणारा तीव्र उताराचा हा संवेदनशील रस्ता कायम अडचणीचा ठरत आहे. रस्त्याच्या (Road) मध्यभागीच या ठिकाणी प्रचंड मोठे खड्डे पडलेले आहेत. यामुळे वाहने नादुरूस्ती होऊन किंवा टायर खड्यात गेल्याने पलटी होत असल्याने तासनतास घाटरस्ता वाहतुकीसाठी बंद पडत आहे.
दरम्यान, यामुळे वाहनधारकांचे (Vehicle Owners) व प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असतात. अनेक वेळेस वाहनधारकांना रस्त्यावर उतरून स्वताःच खड्यांचा बंदोबस्त करण्याची नामुष्की येत असते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण केवळ टोल वसुलीवर लक्ष केंद्रित करत असून, त्यामध्ये तातडीने सुधारणा होण्याची आवश्यकता असल्याची भावना प्रवाशी आणि वाहनधारकांकडून होत आहे.




