नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सरत्या वर्षाला निरोप देत सन २०२६ चे जल्लोषात स्वागत करण्यासाठी नाशिककर (Nashik) सज्ज होत आहेत. त्यासाठी शहर पोलिसांनीही कडक बंदोबस्त व कठोर कारवाईची तयारी केली आहे. दोन्ही परिमंडळे, गुन्हे शाखा व विशेष पथकांनी कारवाई सुरु केली असून ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ कारवाईवर भर देत रस्त्यांवरुन आरडाओरड करणारे व धिंगाणा घालणाऱ्यांवरही गुन्हे नोंदविले जाणार आहे. नववर्षाच्या स्वागतापूर्वी बंदोबस्त आखणी व कारवाईसंदर्भात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दोन्ही परिमंडळासह गुन्हे शाखांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.
नववर्ष स्वागत सेलिब्रेशनवेळी बंदोबस्त व कारवाईसंदर्भातील नियोजनाला पथकांनी सुरूवात केली असून, शहरात महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारपासून (दि. २२) अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नववर्ष स्वागत व नाताळनिमित्त २५ डिसेंबरपासून बंदोबस्तात वाढ करण्यात येईल. सायंकाळी सात वाजेपासून प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या (Police Station) हद्दीत नाकाबंदी करुन तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये मद्यप्राशन करुन वाहने चालवणाऱ्यांसह टवाळखोर व हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. यासह रस्त्यावर धिंगाणा घालणारे व आरडाओरड करणाऱ्यांवरही गुन्हे नोंद केले जाणार आहेत.
दरम्यान, आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व आस्थापना, व्यवस्थापना, मॉल्स, दुकाने, उपहारगृहांमध्ये यांना संबंधित पोलीस ठाण्यांमार्फत योग्य सूचना देण्यात येत आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार आहे. त्यासंदर्भात सर्व पोलीस स्टेशनला आदेश दिले आहेत. तसेच, २८ ते ३१ डिसेंबर आणि १ ते ४ जानेवारीदरम्यान नववर्ष स्वागतनिमित्ताने सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाकाबंदी करण्यात येणार आहे. त्यामध्ये वाहतूक पोलिसांनाही कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. मद्यपींना थेट जिल्हा रुग्णालयात नेत वैद्यकीय तपासणी करुन गुन्हे नोंद होतील. तर राज्य शासनाच्या निर्देशानुसार शहरातील हॉटेलिंग, बार, मद्य विक्री व खरेदी यासह सेलिब्रेशनसंदर्भातील वेळमर्यादेबाबत आयुक्तालय लवकरच निर्णय स्पष्ट करणार आहे.
बंदोबस्ताचे नियोजन…
- तीन पोलीस उपायुक्त, सहा सहायक आयुक्तांसह सर्व अधिकारी-कर्मचारी
- १४ पोलीस ठाण्यांचा बंदोबस्त
- ५ गुन्हे शाखा, गुंडा विरोधी व अमली पदार्थविरोधी पथक
- पाचशेपेक्षा अधिक होमगार्ड; दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक




