नाशिक | प्रतिनिधी | Nashik
विमानाने (Plane) जाणाऱ्या पर्यटकांचा आलेख उंचावत असून गत मार्चच्या तुलनेत ५४ टक्के प्रवासी संख्या वाढल्याचे चित्र आहे. यासोबतच कार्गोसेवेतून मालवाहतुकीमध्येही प्रचंड वाढ झाली असून कार्गोसेवेत शंभर पटीने वाढ झाली आहे. नाशिक विमानतळ हे नागरिक, उद्योजक व व्यापारीवर्गासाठी उपयुक्त असून मार्च २०२५ मध्ये ३४,३४९ प्रवाशांनी विमान सेवेचा लाभ घेतला. गत मार्च २०२४ मध्ये २२,२६९ प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला होता. मार्च महिन्यातील ही प्रवासीवाढ ५४ टक्के झाली आहे.
संपूर्ण वर्षाचा आढावा घेतल्यास २०२३-२४ मध्ये २ लाख ४२ हजार ३७२ प्रवाशांनी (Passenger) तर २०२४-२५ मध्ये ३ लाख ४१ हजार ११२ प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला. वर्षभरातील ही वाढ ४० टक्केच दिसून येत आहे. नाशिक विमानतळावरून कार्गो सेवेमध्येही कमालीची वाढ झाली आहे. मार्च २०२४ मध्ये १८८ मेट्रिक टन मालाची वाहतूक झाली होती. त्यात देशांतर्गत शून्य मेट्रिक टन तर आंतरराष्ट्रीय स्तरावर १८८ मेट्रिक टन मालवाहतूक करण्यात आली होती.
दरम्यान, हेच प्रमाण मार्च २०२५ मध्ये ६६२ मेट्रिक टनावर गेले आहे. त्यात देशांतर्गत १३.६ मेट्रिक टन तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ६४९ मेट्रिक टन एवढे झाले आहे. संपूर्ण वर्षाचा आढावा घेतल्यास २०२३-२४ मध्ये संपूर्ण वर्षात देश-विदेशात ४६३ मेट्रिक टन मालवाहतूक झाली तर हेच प्रमाण २०२४-२५ मध्ये ४,२८० मेट्रिक टन एवढे झाले आहे.
नाशिकची विमानसेवा ही गेल्या काही वर्षात विकसित होत गेली आहे. नाशिकमध्ये खूप क्षमता आहे. त्यामुळे मागील वर्षात झालेली प्रवासीवाढ व कार्गो सेवावाढ ही उत्साहवर्धक आहे. नाशिकमधून आंतरराष्ट्रीय कार्गोसेवा सुरू झालेली असल्यामुळेच कार्गोची आकडेवारी वेगाने वाढली आहे. विमानसेवा वाढवण्यासाठी तसेच विमानतळाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.
मनीष रावल, अध्यक्ष, एव्हिएशन समिती, निमा
विमानसेवेची क्षमता ही नाशिकमध्ये होतीच. मात्र ही आकडेवारी लक्षात घेत विमानसेवा सुरू करण्यासाठी घाबरत असलेल्या विमान कंपन्यांसाठी हे आशादायी आहे. नवनव्या विमानसेवा सुरू होण्यास मदत होईल. दिल्लीसाठी दुसऱ्या फ्लाईटची मागणी आहे. ती लवकरच पूर्णदेखील होईल.
जयेश तळेगावकर