नाशिक | प्रतिनिधी | Nashik
ढोल-ताशांचा धडधडाट, भगव्या ध्वजांची फडफड आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात नाशिककरांनी शुक्रवारी(दि. २५) लाडक्या विघ्नहर्त्याला जड अंतःकरणाने निरोप दिला. यंदाची मुख्य विसर्जन मिरवणूक (Ganesh Visarjan Mirvnuk) ही केवळ भाविकांच्या उत्साहापुरती आणि धार्मिक जल्लोषापुरती मर्यादित न राहता, वेळेचे व नियमांचे पालन, पोलीस प्रशासनाचे शिस्तबद्ध नियोजन आणि काही मंडळांमधील अंतर्गत मतभेद व वाढती नाराजी यांमुळे शहराच्या गणेशोत्सवातील एक नवा आणि महत्त्वाचा अध्याय ठरली.
शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेली ही मुख्य मिरवणूक मध्यरात्री १.१० मिनिटांनी वाजता पूर्ण शांततेत आणि शिस्तबद्ध रीतीने पार पडली. सुमारे तेरा तासांहून अधिक काळ चाललेल्या या सोहळ्यात नियमांचे पालन आणि काही मंडळांच्या सावकाश चालण्याच्या हट्टामुळे निर्माण झालेला तणाव, अशा दोन्ही बाजूंचा अनुभव नाशिककरांनी घेतला. भद्रकाली हद्दीतील वाकडी बारव येथून शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता नाशिक महानगरपालिकेच्या श्रींची आरती करून यंदाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, महापौर हिमगौरी आडके, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापालिका आयुक्त मनिषा खत्री, उपायुक्त मोनिका राऊत, महंत भक्तीचरणदास यांच्यासह नाशिक सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, नगरसेवक शाहू खैरे, माजी महापौर विनायक पांडे आणि माजी नगरसेवक गजानन शेलार आदी मान्यवर व सर्व मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेच्या मिरवणुकीत स्वतः परंपरागत ढोलवादन करून उपस्थितांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित केला. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरला.
गणेशोत्सव महामंडळाचा जाहीर निषेध
यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत एकीकडे सुरुवातीची मानाची मंडळे वेळेत मार्गस्थ झाल्याने सोहळ्याची रंगत वाढली असली, तरी दुसरीकडे काही मंडळांच्या सावकाश पुढे सरकण्याच्या हट्टामुळे नियोजनाचा फज्जा उडाला. सांगली बँक सिग्नल, एम. जी. रोड व मेहेर परिसरात काही मंडळे दीड ते दोन तास एकाच ठिकाणी रेंगाळली. ढोलपथकांनी एकाच ठिकाणी वीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ वादन केल्यामुळे संपूर्ण मिरवणुकीची गती मंदावली. सकाळी साडेअकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत केवळ मंडळांचे पदाधिकारी आणि पोलिसांशिवाय भाविकांचा सहभाग अत्यंत तुरळक होता. सायंकाळी साडेपाच वाजता केवळ चौथे मंडळ मेहेर सिग्नलवर पोहोचू शकले होते, तर सायंकाळी सव्वासात वाजता नाशिकचा राजा मेहेर सिग्नलवर आला होता. या मंद गतीमुळे पंधराव्या क्रमांकाच्या मागे असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी संतप्त झाले. रात्री साडेसातनंतरही ही मंडळे वाकडी बारव या मूळ जागेवरून पुढे सरकू शकली नव्हती. त्यामुळे संतप्त काही मंडळांच्या अध्यक्षांनी थेट रस्त्यावर बसून तर कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडून पोलीस व प्रशासनाविरोधात विरोध दर्शवला. ‘ही पारंपरिक क्रमावर आधारित पद्धत नाही, नाशिक गणेशोत्सव महामंडळाचा जाहीर निषेध’ अशा मजकुराचे फलक मिरवणुकीत थेट झळकवण्यात आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
सायंकाळनंतर भक्तांचा जनसागर
दिवसभराच्या शांततेनंतर सायंकाळी सहा वाजेनंतर नाशिक शहर (Nashik City) विसर्जन सोहळा पाहण्यासाठी रस्त्यावर उतरले. गंगापूर रोड, सीबीएस आणि मुख्य मिरवणूक मार्गाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. २५ प्रमुख मंडळे, ३० पेक्षा जास्त ढोल-ताशा पथके, सटाणा ढोल आणि डीजेच्या दणदणाटाने परिसर दुमदुमून गेला. तरुण-तरुणींसह अबालवृद्धांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत सोहळ्यात चैतन्य आणले. मिरवणुकीत गणेशमूर्तींच्या रथांवर केलेली आकर्षक पुष्परचना भाविकांचे डोळे दीपवून टाकत होती. विशेषतः ‘बॅलेन्सिंग गणेशमूर्ती’, व्यंकटेश मंदिराची हुबेहूब साकारलेली भव्य आरास आणि डमरू वादक हे यंदाच्या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण केंद्र ठरले. ढोलपथकांचा तालावरील सराव आणि गणेशभक्तांची छायाचित्रे, व्हिडिओ आणि रील्स बनवण्यासाठी लागलेली चढाओढ यामुळे सोशल मीडियावरही या सोहळ्याचे क्षण वेगाने व्हायरल होत होते.
मध्यरात्री ठीक १२ वाजता डीजे बंद
रात्री साडेसहानंतर मेहेर, अशोक स्तंभ, सांगली बँक सिग्नल आणि रविवार कारंजा या अरुंद मार्गांवर भक्तांची प्रचंड गर्दी झाली. ढोलपथकांच्या सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या दोऱ्यांमुळे नागरिकांना पुढे चालणेही कठीण झाले होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस यंत्रणा सकाळपासूनच अॅक्शन मोडमध्ये होती. संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी बॉम्ब शोधक व नाशक पथकाद्वारे सर्व रथांची कसून तपासणी करण्यात आली, तर संपूर्ण मिरवणूक मार्गावर ड्रोन कॅमेरे आणि सीसीटीव्ही नेटवर्कच्या साहाय्याने निगराणी ठेवण्यात आली. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांनी मध्यस्थी करत दाटी झालेल्या ठिकाणी मंडळांना पुढे सरकण्याच्या सूचना केल्या. यादरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या काहींना पोलिसांच्या लाठीचा प्रसादही घ्यावा लागला. न्यायालयाच्या आणि शासनाच्या नियमांचे पालन करत मध्यरात्री ठीक ११.५९ वाजता दंडे हनुमान मित्र मंडळ मेहेर सिग्नलवर असताना पोलिसांनी ध्वनिक्षेपकावरून सूचित केले. सर्व मंडळांनी कसलाही विरोध न करता तातडीने डीजे व साउंड सिस्टिम असलेली वाहने बाजूला घेतली. त्यानंतर साडेबारा वाजेपर्यंत केवळ पारंपरिक वाद्यांचा गजर सुरू होता. रात्री १ वाजता वाजता सर्व वादन स्वतःहून थांबवण्यात आले आणि कायदा-सुव्यवस्थेचा ताबा घेत पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी मिरवणूक मार्ग पूर्णपणे मोकळा केला.
मिरवणुकीत सहभागी प्रमुख मंडळे
भव्य विसर्जन सोहळ्यात नाशिक शहरातील प्रमुख आणि नामांकित मंडळांनी सहभाग घेतला. यामध्ये नाशिक महानगर पालिका, रविवारी कारंजा मित्र मंडळ, गुलालवाडी व्यायाम शाळा, भद्रकाली कारंजा मित्र मंडळ (साक्षी गणेश), श्रीमान सत्यवादी मित्र मंडळ, सूर्यप्रकाश नवप्रकाश मित्र मंडळ (नाशिकचा राजा), सरदार चौक मित्र मंडळ, श्री गणेश मूकबधिर मित्र मंडळ, रोकडोबा मित्र मंडळ, शिवसेना युवक मित्र मंडळ, शिवमुद्रा मित्र मंडळ (मानाचा राजा), युवक मित्र मंडळ, दंडे हनुमान मित्र मंडळ, युनायटेड फ्रेंड्स सर्कल, श्री शनेश्वर युवक समिती, नेहरूचौक मित्र मंडळ पिंपळपार, वेलकम सहकार्य मित्र मंडळ, गजानन मित्र मंडळ, महालक्ष्मी चाळ सोशल फाउंडेशन, शिवस्य जनसेवा समिती, भोईराज मित्र मंडळ, नवक्रांती मित्र मंडळ, विनय नगर मित्र मंडळ, श्री तिळभांडेश्वर मित्र मंडळ आणि हिंदू एकता आंदोलन पक्ष या मंडळांचा अनुक्रमाने समावेश होता.
मिरवणुकीतून…
- मिरवणुकीवर पोलिसांच्या ड्रोनसह सीसीटीव्हींची नजर
- २५ मंडळे, ३० पेक्षा जास्त ढोलपथके, सटाणा ढोल, डीजेचा आवाज
- ढोलताशांच्या निनादावर थिरकली तरुणाई
- गणेशमूर्तींच्या रथावर आकर्षक पुष्परचना
- ‘बॅलेन्सिंग गणेशमूर्ती’, व्यंकटेश मंदिराची आरास, डमरू वादक लक्षवेधी
- रात्री सातनंतर भक्तांची गर्दी वाढली; गंगापूररोड, सीबीएसकडे वाहनांची पार्किंग
- व्हिडिओ, फोटो, रील्स करण्यात ढोलपथकांसह भक्तांची चढाओढ
- मिरवणूक सावकाश मार्गस्थ करण्यासाठी काही मंडळांचा हट्ट; अध्यक्ष रस्त्यावर बसले
- मिरवणुका रेंगाळल्याने पाठीमागील मंडळांची नाराजी; कार्यकर्त्यांचेही मांडला ठिय्या
- सायंकाळी सव्वा सात वाजता नाशिकचा राजा मेहेर सिग्नलवर
- रात्री नऊ वाजता सर्व मंडळे दूध बाजाराच्याही पुढे पोहोचली




