पंचवटी | प्रतिनिधी | Nashik
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Nashik APMC) सभापती देविदास पिंगळे (Devidas Pingale) हे बाजार समितीत मनमानी व हुकूमशाही पद्धतीने कामकाज करत असल्याच्या आरोप करून पिंगळे यांच्या पॅनलमधून निवडून आलेल्या संचालकांनी माजी सभापती शिवाजी चुंभळे (Shivaji Chumbhale) यांच्या नेतृत्वाखाली १५ संचालकांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे सोमवार (दि.०३) रोजी अविश्वास ठराव दाखल केला होता.
त्याअनुषंगाने आज (मंगळवारी) बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीत सकाळी ११ वाजता प्राधिकृत अधिकारी तथा उपजिल्हा निवडणुक अधिकारी, नाशिक डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षेतखाली व बाजार समितीचे सचिव प्रकाश घोलप यांच्या उपस्थितीत विशेष सभा (Meeting) पार पडली. यावेळी बाजार समितीला पोलिस (Police) छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
त्यानंतर सभेत सभापती देविदास पिंगळे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. तर नवीन सभापती निवडीपर्यंत बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर (Vinayak Malekar) यांची प्रभारी सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. देविदास पिंगळे यांच्यावर अविश्वास ठराव (No Confidence Motion) दाखल करून चुंभळे यांनी १० संचालकांना सहलीसाठी परदेशात पाठवले होते ते सोमवारी सायंकाळी नाशकात (Nashik) परतले. यानंतर सकाळी ११ वाजेच्या सुमारास अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी बाजार समितीमध्ये दाखल झाले होते.
दरम्यान, नुकताच शिवाजी चुंभळे यांनी महिनाभरापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपच्या मदतीने चुंभळे यांनी बाजार समितीमध्ये पिंगळे यांना धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तसेच देविदास पिंगळे यांनी आपल्या गटाचे संचालक मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पैसे देवून फोडल्याचा आरोप केला होता. परंतु, हे सर्व आरोप शिवाजी चुंभळे यांनी फेटाळून लावले होते. मात्र दुसरीकडे भाजपने राष्ट्रवादीची (अजित पवार गट) नाशिक बाजार समितीच्या माध्यमातून सत्ता उलथवून लावल्याचे बोलले जात आहे.