Monday, November 25, 2024
Homeक्राईमNashik News : मारहाणीत एकाचा मृत्यू

Nashik News : मारहाणीत एकाचा मृत्यू

शिरवाडे वाकद | Shirwade Vakad

‘समाज मंदिराजवळ का थुंकले’अशी विचारणा केल्याचा राग येऊन रुई ता.निफाड (Niphad) येथील तिघांनी विकास शांताराम दुशिंग यांस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत जबर जखमी झालेल्या दुशिंग यांचा काल जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असतांना मृत्य झाला. त्यानंतर आता या प्रकरणी तिघांवर लासलगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने (Court) आरोपींना (दि.२८) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

याबाबत गणेश दशरथ केदारे (२५) व्यवसाय चालक (रा.वाघदर्डी,ता.चांदवड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले फिर्यादीचे मयत मामा विकास शांताराम दुशिंग (३८) व आरोपी रुई ता.निफाड या एकाच गावचे रहिवाशी आहेत. दि.२० नोव्हेंबर रोजी सायं ६.३० वाजेच्या दरम्यान आरोपी हे गोदावरी डावा कालव्या लगतच्या समाज मंदिराजवळ गुटखा खावुन थुंकले. त्यावेळी तेथे हजर असलेले फिर्यादीचे मयत मामा विकास दुशिंग हे आरोपींना ‘तुम्ही समाज मंदिराजवळ का थुंकले’ असे बोलले. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा आरोपी अजय भिमा बर्डे (२१) रोहन रमेश माळी (२०) समाधान संजय पवार (२१) सर्व.रा.रुई यांनी फिर्यादीच्या मयत मामास शिवीगाळ करुन आरोपी अजय भिमा बर्डे याने हातचापटीने गालावर मारहाण केली.

तसेच आरोपी रोहन रमेश माळी व समाधान संजय पवार यांनी फिर्यादीच्या मयत मामास जमिनीवर खाली पाडुन छातीवर पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) करून व त्यास तू पुन्हा आमच्या नादी लागला तर तुला मारुन टाकु’ असा दम देऊन तेथुन निघुन गेले. सदर मारहाणीत मयतास छातीस व पोटास गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असतानाच रविवार (दि.२४) रोजी पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान वरील फिर्यादीवरून आरोपींच्या विरोधात गु.रजि.नं.३०३ /२०२४ भा.न्या.सं.२०२(३) चे कलम १०३,११८(१), ११५(२), ३५२,३५१(२)(३),३(५) अन्वये खुनाचा गुन्हा (Murder Case) दाखल करण्यात आला असून लासलगाव पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक केली आहे. तसेच आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना गुरुवार (दि.२८) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर सदर घटनेचे गांभीर्य पाहता अप्पर पोलीस अधीक्षक मा.आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ.निलेश पालवे यांनी भेट दिली असून याबाबत अधिक तपास सपोनि बी.जे.शिंदे करत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या