नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महापालिका निवडणुकीचा (Municipal Election) प्रचार मंगळवारी (दि. १३) सायंकाळी पाच वाजता थंडावताच शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लागू झाला आहे. त्यासाठी सोमवारी (दि.१२) हिंगोलीसह परजिल्ह्यातील पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त नाशिक शहरात दाखल झाला. दरम्यान, आज (मंगळवारी) सायंकाळनंतर शहर पोलिसांसह सशस्त्र पथके गल्लीबोळ, चौक, प्रमुख रस्ते, मतदान केंद्रे व स्ट्राँगरूमचा ताबा घेतला आहे.
हे देखील वाचा : Nashik MC Election : नाशकात ऐन थंडीत राजकीय वातावरण तापले; ‘आप’च्या उमेदवारावर ताणली बंदूक!
मतदान (Voting) व मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सुरक्षा यंत्रणेचे नियोजन शहर पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेने पूर्ण केले आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सोमवारी (दि. १२) संवेदनशील मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला. त्यानंतर उपायुक्त किरणकुमार चव्हाण व सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी स्ट्राँगरूम, भरारी पथके, क्षेत्रीय पथके आणि गस्ती पथकांना आवश्यक सूचना दिल्या. दोन्ही परिमंडळांमध्ये उपायुक्त मोनिका राऊत व किशोर काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकांना अलर्ट करण्यात आले आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime : ‘बर्गमेन’वरील स्नॅचर अखेर सापडला; इराणी टोळीतील सराईत कल्याणमधून ताब्यात
प्रचार थांबताच सायंकाळपासून प्रत्येक भागात पोलीसांनी (Police) तळ ठोकला असून संशयास्पद हालचालींवर बारकाईने नजर असणार आहे. बुधवारी (दि. १४) सकाळपासून मतदान साहित्याचे वितरण सुरू होणार असल्याने प्रत्येक स्ट्राँगरूमभोवती मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात केला जाईल. याकाळात संबंधित परिसरातील वाहतूक वळवण्यात येणार असून सशस्त्र बंदोबस्तात साहित्य मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवले जाईल. गुरुवारी (दि. १५) मतदानानंतर सर्व साहित्य पुन्हा स्ट्राँगरूममध्ये जमा केले जाणार आहे. त्यानंतर शुक्रवारी (दि. १६) मतमोजणीसाठी सकाळपासून पुन्हा कडक बंदोबस्त लागू राहील. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याने मंगळवारी सायंकाळी उभारलेला पोलीस बंदोबस्त शनिवारी पहाटेपर्यंत कायम ठेवण्यात येणार आहे.





