नाशिक | Nashik
सातपूर (Satpur) येथील ऑरा बार प्रकरणासह खंडणीच्या विविध गुन्ह्यांमध्ये मोक्काच्या कारवाईमधील अटकेत असलेले आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे (Prakash Londhe) यांना काल (मंगळवारी) रात्री नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून पोलीस बंदोबस्तात सातपूर आणण्यात आले होते. त्यांच्या काकुंचे निधन झाल्याने पोलिसांकडून त्यांना अंत्यदर्शनासाठी आणण्यात होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती.
प्रकाश लोंढे यांच्या काकू भिकूबाई हौसाराम लोंढे यांचे मंगळवारी दुपारी निधन झाले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत. दरम्यान पुतण्या प्रकाश लोंढे यांनी काकूचे अंत्यदर्शन घेता यावे यासाठी न्यायालयाकडे (Court) परवानगी मागितली होती. यानंतर न्यायालयाने त्यांना सायंकाळी परवानगी दिली. त्यानंतर सातपूर पोलिसांनी (Satpur Police) रात्री आठ वाजता कारागृहातून प्रकाश लोंढे यांचा ताबा घेतला. त्यांना साडे आठ वाजता पोलीस बंदोबस्तात सातपूर येथे आणण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
दरम्यान, सातपूर येथील स्वारबाबानगर अमरधाम परिसरात दंगल नियंत्रण पथकाच्या तुकडीलाही पाचारण करण्यात आले होते. यावेळी पोलिस जीपमधून खाली उतरताच लोंढे यांनी काकूच्या अंत्यदर्शनासाठी चालत जाताना कुटुंबीयांना उद्देशून ‘रडायचं नाही, लढायचं…असे उद्गार काढले. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता लोंढे यांना सातपूरमधून पुन्हा मध्यवर्ती कारागृहात पोलिसांनी दाखल केले.
प्रकाश लोंढे निवडणुकीच्या रिंगणात
सध्या नाशिक महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून, प्रकाश लोंढे (Prakash Londhe) यांनी देखील तुरूंगातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग क्रमांक ११ मधून ते आरपीआयच्या (RPI) तिकिटावर निवडणूक लढवत असून, त्यांची सून अॅड. दीक्षा लोंढे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. प्रकाश लोंढे यांची लढत मनसेच्या सलीम शेख यांच्याशी होत आहे.
या प्रकरणात करण्यात आली आहे अटक
सातपूर येथील ‘ऑरा बार’मधील गोळीबार प्रकरणात (Firing Case) रिपाइंचे जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि त्यांचा मुलगा दीपक लोंढे याला अटक करण्यात आली होती. तर दुसरा मुलगा भूषण प्रकाश लोंढे हा फरार झाला होता. त्यानंतर नाशिक पोलिसांनी उत्तरप्रदेशातून मोठ्या शिताफीने भूषणसह त्याच्या साथीदाराला अटक केली होती.लोंढे पिता-पुत्रासांह त्यांच्या साथीदारांवर गोळीबार, खंडणी, हप्ता वसुली, मालमत्ता कब्जा, फसवणूक आणि दहशतीचे गंभीर गुन्हे नोंद असल्याने नाशिक पोलीस आयुक्तालयाने मकोका लावला आहे.





