नाशिक | भारत पगारे | Nashik
कारागृहातील बंद्यांच्या आयुष्याला नवीन दिशा देण्यासाठी आणि त्यांच्यात सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी महाराष्ट्राच्या कारागृह (Maharashtr Jail) व सुधारसेवा विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कारागृहात राहून पदवी, पदव्युत्तर किंवा थेट पीएच. डी. सारखे उच्च शिक्षण (Education) पूर्ण करणाऱ्या, तसेच क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या कैद्यांना आता तब्बल ९० दिवसांपर्यंतची विशेष माफी (शिक्षेत सवलत) मिळणार आहे. अपर पोलीस महासंचालक व सुधारसेवा महानिरीक्षक सुहास वारके यांनी परिपत्रक जारी केले आहे.
यापूर्वीचे २०१९ आणि २०२३ मधील जुने परिपत्रक रद्द करून, अधिक स्पष्ट आणि पारदर्शक नियमावलीसह हे नवीन परिपत्रक लागू करण्यात आले आहे. या निर्णयामुळे नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहासह राज्यातील तमाम कारागृहातील कैद्यांना (Prisoners) शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मोठी प्रेरणा मिळणार आहे. ही सवलत केवळ हक्क नसून, कैद्यांना सुधारण्यासाठी दिलेली एक विशेष प्रोत्साहनपर सवलत आहे.
दरम्यान, अधीक्षकांचा स्वयंस्पष्ट अभिप्रायः कैद्याचा संपूर्ण कारागृहीन इतिहास, त्याचा वर्तणूक तक्ता आणि अधीक्षकांच्या स्वयंस्पष्ट अभिप्रायानंतरच विभागीय कार्यालयामार्फत हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पुणे मुख्यालयात पाठवला जाईल.
वैशिष्टये आणि अटी
- – एकत्रित शिक्षेची मर्यादाः उच्च शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील विशेष कामगिरी या दोन्ही आघाड्यांवर मिळून कैद्याला संपूर्ण शिक्षा कालावधीत एकूण १८० दिवसांपेक्षा जास्त माफी मिळणार नाही.
– कारागृहातूनच शिक्षण अनिवार्यः या विशेष शैक्षणिक माफीचा लाभ घेण्यासाठी संबंधित कैद्याने तो संपूर्ण शैक्षणिक अभ्यासक्रम कारागृहात बंदिस्त असतानाच पूर्ण केलेला असावा.
– पडताळणी होणारः बोगसगिरी रोखण्यासाठी, कैद्याने मिळवलेले गुणपत्रक आणि प्रमाणपत्र. - – संबंधित विद्यापीठाकडून अधिकृतपणे पडताळणी (व्हेरिफिकेशन) करूनच त्याचे प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठवणे बंधनकारक.
- – दहावी, बारावी व डिप्लोमासाठी वेगळी सवलतः पदवीव्यतिरिक्त कारागृहातून १० वी, १२ वी समकक्ष परीक्षा, किंवा कोणताही डिप्लोमा, प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केल्यास, त्यांना माफी देण्याचे विशेष अधिकार संबंधित कारागृह उपमहानिरीक्षक व अधीक्षकांना देण्यात आले आहेत.
अशी मिळणार ‘विशेष माफी’!
अभ्यासक्रम/ उपक्रम मिळणारी विशेष माफी शेरा
पदवी अभ्यासक्रम ९० दिवसांपर्यंत कोणत्याही एका पदवीसाठी (एकवेळ)
पदव्युत्तर पदवी ९० दिवसांपर्यंत कोणत्याही एका पदवीसाठी (एकवेळ)
एम. फिल, पीएच. डी. ९० दिवसांपर्यंत कोणत्याही एका पदवीसाठी (एकवेळ)
विशेष प्राविण्य (खेळ/स्पर्धा)९० दिवसांपर्यंत




