ओझे | विलास ढाकणे | Oze
पेठ तालुक्यातील बोरीचीबारी (Borichibari) याठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे सदर ठिकाणी काही महिला पाण्याच्या (Water) शोधात हंडा घेऊन एका विहिरीतून (Well) पाणी काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत विहिरीत उतरत असल्याबाबतचा एक व्हिडीओ एक्स (ट्विटर)या समाज माध्यमावर शुक्रवार (दि.२०) रोजी प्रसिध्द झाला होता.त्यानंतर सदर बातमीची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन आज (सोमवारी) सकाळी १० वाजता, तहसीलदार, गटविकास अधिकारी पेठ यांनी मौजे बोरीचीबारी येथे संयुक्त भेट देऊन पाणीटंचाई बाबत पंचनामा, स्थळनिरीक्षण व आवश्यक त्या उपाययोजनांसह अहवाल सादर करण्याची कार्यवाही केली.
बोरीचीबारी येथील लोकसंख्या (Population) ५५४ इतकी असून, टंचाई आराखडयात माहे एप्रिल ते जूनच्या टप्प्यात विहिर अधिग्रहण करणे बाबतची उपाययोजना केल्या जातात . मागील वर्षी (सन २०२३-२४ मध्ये) याच कालावधीत विहीर अधिग्रहण करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा (Water Supply) केला जात होता. बोरीचीबारी येथे दोन वर्षापूर्वी स्वदेश फाऊंडेशन मार्फत नळ पाणी पुरवठा योजना केलेली असून,तेथे नळाद्वारे फेब्रुवारी २०२५ पर्यंत व त्यानंतर एप्रिल २०२५ च्या दुसऱ्या आठवडयापर्यंत ग्रामस्थांना पाणी पुरवठा केला जात होता.
मात्र, त्यानंतर (.१७ एप्रिल) पासून खाजगी टँकरद्वारे गावातील सार्वजानिक विहिरीत पाणी टाकण्यात येत होते व सदर विहीरीतून बादलीद्वारे पाणी गावातील (Village) महिला काढत होत्या. यानंतर (दि. १७) रोजी ग्रामपंचायत अधिकारी यांनी तेथील विहिर अधिग्रहण करण्यासाठी भेट देऊन अहवाल तयार करण्याची कार्यवाही केली. त्याचदिवशी संबंधित शेतकऱ्यास प्रस्ताव मंजूर होईपर्यंत टँकरद्वारे सार्वजानिक विहीरीत पाणी टाकावे असे सूचित केले होते.
बोरीचीबारी येथे नळ पाणी पुरवठा योजना व्यतिरिक्त वापरातील एक सार्वजनिक विहिर आहे. सदर विहीरीत आजरोजी ग्रामपंचायतमार्फत (Grampanchayat) खाजगी विहीरीतून पाणी टँकरद्वारे सोडून पाणीपुरवठा केला जात आहे. तथापि त्यास काही ग्रामस्थांचा उपसरपंच व पोलीस पाटील यांचा विरोध दिसून आला. शुक्रवार (दि.२०) रोजी सकाळी तेथील एका महिलेस पाणी घेण्यासाठी विहिरीत उतरवून व्हिडीओ तयार करून समाज माध्यमांवर कोणीतरी त्रयस्थ व्यक्तीने (गावातील आपसातील मतभेदामुळे) प्रसिध्द केला असे चौकशी मध्ये दिसून आले.या विहिरीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे,त्या विहीरीचे पाणी वापरले जात नसून त्या विहिरीला अत्यल्प पाणी दिसून आले.
दरम्यान, विहिर अधिग्रहण प्रस्ताव मान्यता मिळेपर्यंत ग्रामपंचायत बोरीचीबारी हे आता स्वखर्चाने पुरेसा पाणी पुरवठा करणार असून सार्वजनिक विहिरीत ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे पाणी न टाकता ग्रामस्थांच्या (Villagers) घरासमोरील ड्रममध्ये ठिकठिकाणी टँकरद्वारे पाणी वाटप सुरू केले आहे.तसेच क्षेत्रीत स्तरावरील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी गंभीरतेने पाणीटंचाई व टंचाई निवारणार्थ केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी व नागरिकांना पाण्यासाठी वन वन भटकावे लागणार नाही,याबाबत आवश्यक ती कार्यवाही तत्परतेने करावी असे आव्हान प्रांताधिकारी यांच्यामार्फत करण्यात येत आहे.