पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
पवित्र रामकुंडात (Ramkund) गटारींचे पाणी जाणार नाही, असा दावा करणाऱ्या स्मार्ट सिटी आणि महानगरपालिका प्रशासनाची पोलखोल सोमवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने (Rain) केली. गोदाघाट व रामकुंड परिसरात सुरू असलेल्या विकासकामांच्या ढिसाळ नियोजनामुळे गटारींचे चेंबर ओव्हरफ्लो होऊन अत्यंत दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी थेट पवित्र रामकुंड आणि परिसरात वाहू लागले. या प्रकारामुळे देशभरातून आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय झाली असून, संतप्त भाविकांनी या परिस्थितीचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.
गोदाघाट परिसरात (Godaghat Area) आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर “रामकाल पथ” आणि भुयारी गटारींची विविध विकासकामे सुरू आहेत. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे मालेगाव स्टँड उतार, इंद्रकुंड परिसर, लेंडी नाला गटार लाईन आणि वैष्णव रोडवरील गटारींच्या लाईन पूर्णपणे तुंबल्या. चेंबरवरील ढापे उखडून गटारींचे दूषित पाणी रामकुंड, सीताकुंड आणि मारुती कुंडाच्या दिशेने वाहू लागले. यामुळे काही काळासाठी रामकुंडाला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले होते.
प्रभू श्रीरामांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या पंचवटीत दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा (Simhastha Kumbhmela) भरतो. वर्षभर येथे देश-विदेशातील पर्यटक व भाविकांची मोठी वर्दळ असते. मात्र, नाशिकची धार्मिक ओळख असलेल्या रामकुंडाची ही अवस्था पाहून स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी (Tourist) प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र ताशेरे ओढले आहेत.
पालकमंत्र्यांच्या ‘अल्टीमेटम’नंतर दुसऱ्याच दिवशी पोलखोल
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाला अवघे ४० दिवस उरले असून, या सोहळ्यासाठी देश-विदेशातील साधू-संत, भाविकांसह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर, रविवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रामतीर्थाला अचानक भेट देऊन तीन आठवड्यांत कामे पूर्ण करण्याचा अल्टीमेटम दिला होता. मात्र, २४ तास उलटण्यापूर्वीच सोमवारी झालेल्या पावसाने प्रशासनाच्या दाव्यांमधील फोलपणा उघड पाडला. महापालिका व स्मार्ट सिटी प्रशासनाने या समस्येवर त्वरित कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
गटारीचे पाणी पवित्र रामकुंडात थेट मिसळत असल्याचे चित्र अत्यंत चिंताजनक आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अशी परिस्थिती निर्माण होत असेल, तर येणाऱ्या भाविकांसमोर काय प्रतिमा निर्माण होईल. रामकुंडासारख्या पवित्र स्थळी स्वच्छता आणि मूलभूत सुविधा राखण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. पावसाळ्यातील अशा परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करून भाविकांची गैरसोय दूर करावी.
रामचरण पवार (भाविक, बालाघाट, मध्य प्रदेश)




