नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने राज्य शास-नाने अर्थसंकल्पात जिल्ह्यातील रस्ते कामांसाठी २,२७० कोटी रुपयांची मोठी तरतूद केली आहे. त्यामुळे नाशिकमधील रस्ते कात टाकणार आहेत. त्यात प्रामुख्याने नाशिक-त्र्यंबक मार्गाचे काँक्रिटीकरण व सहापदीकरण करण्याच्या महत्त्वाकांक्षी ३५० कोटी रुपयांच्या कामाला राज्य शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. या प्रकल्पामुळे त्र्यंबक परिसरातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असून, त्यासोबत येथे असलेल्या पायाभूत सुविधांची सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात नाशिक जिल्हा कुंभमेळ्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद नसल्याने नाशिककरांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. परंतू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कामांच्या माध्यमातून कुंभमेळ्यासाठी २,२७० कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्राधान्यक्रमात वेळ लागणाऱ्या कामांतील रस्ते कामांना वेग मिळणार आहे.प्रशासनाकडून लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येऊन कामांना सुरूवात केली जाणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले.
कुंभमेळा कालावधीत पाच कोटी भाविक नाशिकला येण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. कुंभमेळा नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होत असल्याने त्र्यंबकेश्वर येथे भाविक शाहीस्नानासाठी मोठ्या संख्येने जात असतात. यंदाच्या कुंभमेळ्यात भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता सध्याचा मार्ग हा अपुरा पडण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली असून, नाशिक-त्र्यंबक रस्ता सहापदरीकरण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या प्रस्तावाला शासनाने मंजुरी देत हा मार्ग काँक्रीटीकरण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या कामासाठी अर्थसंकल्पात ३५० कोटींच्या खर्चालाही मंजुरी देण्यात आली आहे. या सहापदरीकरण प्रकल्पामध्ये ट्रैकिंग रस्त्यांसह, पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांचा समावेश केला जाणार आहे. तसेच, या विस्तारीकरणामुळे परिसरातील बाहतूक व्यवस्थेत सुधारणा होऊन वाहतूक कोडीची समस्या सुटेल.
९१ कि.मी. बाह्य रिंगरोडचे मजबुतीकरण
नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या ९१ किलोमीटरच्या राज्य महामार्ग-३७ च्या रस्त्यांचेही मजबुतीकरण करण्यात येणार आहे. या माध्यमातून नाशिक शहराचा ‘बाह्य रिंग रोड’ तयार होणार आहे. शासनाच्या मंजुरीमुळे या कामाला गती मिळणार आहे. याकरीता अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे होणार असून दळणवळण यंत्रणा अधिक सुलभ होणार आहे.
असे आहेत बाह्य रिंग रोड
बहुतेक रस्ते नाशिक शहराभोवती जाणारे आहेत. त्यामुळे वाहनांना नाशिक शहरात प्रवेश करावा लागणार नाही. सिंहस्थाच्या गर्दीचा त्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार नाही. हे रस्ते घोटी (नाशिक-मुंबई महामार्गावरील) ते त्र्यंबकेश्वर, त्र्यंबकेश्वर ते रामशेज (नाशिक-पेठ रोड), रामशेज ते दिंडोरी, त्र्यंबकेश्वर ते दिंडोरी, दिंडोरी विमानतळ मार्गे ओझर (नाशिक-आग्रा महामार्ग), ओझर ते चांदोरी (नाशिक-छत्रपती संभाजीनगर रस्ता), चांदोरी ते शिंदे (नाशिक-पुणे महामार्ग) आणि शिंदे ते घोटी यांना जोडतात.
नाशिक-दिंडोरी-वणी रस्त्याचे चौपदरीकरण
या योजनेत नाशिक-दिंडोरी रस्त्याचे संपूर्ण काँक्रिटीकरण आणि मजबुतीकरण समाविष्ट आहे. दिंडोरीजवळील वणी येथील सप्तशृंगी मंदिराकडे हा रस्ता जातो आणि कुंभमेळ्यादरम्यान मोठ्या संख्येने यात्रेकरूंना आकर्षित करणारा ठरेल. हा ३५ कि.मी. चा रस्ता सापुतारा मार्गे गुजरातला देखील जोडतो.
रस्ते आणि तरतूद
नाशिक-त्र्यंबकेश्वर ३५० कोटी, जानोरी-ओझर ५० कोटी, पेठ-हरसुल-त्र्यंबकेश्वर-पहिने-घोटी : २०५ कोटी, नाशिक दिंडोरी रस्त्यावरील पूल १५ कोटी, वाडीवऱ्हे नागलवाडी मार्ग २०० कोटी, घोटी ते दुगाव ते तुपादेवी २१५ कोटी, नाशिक पेठ २०५ कोटी, शिर्डी राहता बाह्य वळण १६५ कोटी, नाशिक दिंडोरी वणी मार्ग १०० कोटी, आडगाव गिरणारे वाघेरे १०० कोटी,
जानोरी ओझर ५० कोटी, त्र्यंबकेश्वर,धोंडेगाव,उमराळे,दिंडोरी,पालखेड,पिंपळगाव : २१५ कोटी