नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिकच्या (Nashik) सांस्कृतिक परंपरेचा मानबिंदू असलेल्या मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीला (Ganesh Visarjan Mirvnuk) यंदा राजकीय वर्चस्ववाद, प्रशासकीय ढिसाळपणा आणि सार्वजनिक मंडळांमधील अंतर्गत गटबाजीचे गालबोट लागले. वाकडी बारव येथून पालकमंत्री, महापौर आणि स्थानिक आमदारांच्या (MLA) उपस्थितीत थाटात सुरू झालेली मुख्य विसर्जन मिरवणूक यंदा भक्तीभावापेक्षा ‘राजकीय ताकद’ दाखवण्याचा आखाडा बनल्याचे चित्र पाहायला मिळाले. राजकीय वरदहस्त असलेल्या बड्या मंडळांनी चौकाचौकांत तासनतास तळ ठोकल्यामुळे लहान मंडळांची काेंडी झाली, ज्याचे रूपांतर थेट पोलीस ठाण्यातील ठिय्या आंदोलनात झाले.
मिरवणूक वेळेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने प्रत्येक चौकात वीस मिनिटांची कालमर्यादा आखून दिली होती. भद्रकालीतील वाकडी बारव येथून सकाळी साडेअकराच्या सुमारास मिरवणूक सुरू झाल्यानंतर पहिल्या चार-पाच मंडळांवर पोलिसांनी (Police) वेगाने पुढे सरकण्यासाठी सक्ती केली. मात्र, सायंकाळी मेहेर सिग्नलजवळ पोहोचताच राजकीय पार्श्वभूमी असलेल्या बड्या मंडळांचा खरा चेहरा समोर आला. लाखो रुपये खर्च करून आणलेली आकर्षक विद्युत रोषणाई, डीजे आणि साऊंड सिस्टिमचा प्रभाव दिवसाच्या उजेडात पडत नसल्याचे लक्षात येताच महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांच्यासह राजकीय ताकद असलेल्या पदाधिकाऱ्यांनी फाळके रोडवर थेट रस्त्यावर बसून आंदोलन सुरू केले.
पोलीस मॅरेथॉन घेतात की काय? असा सवाल करत त्यांनी मिरवणूक रोखून धरली. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पोलिसांनी मध्यस्थी करून सायंकाळी साडेपाच वाजता आंदोलन सोडवले खरे, पण त्यानंतर बड्या मंडळांनी स्वतःच्या सोयीनुसार संथगतीचे धोरण स्विकारले. अनेक नामांकित मंडळांनी एकाच चौकात थेट दीड ते दोन तास थांबून रेंगाळण्यास सुरुवात केली. राजकीय दबावापोटी पोलीस प्रशासन या बड्या मंडळांना पुढे ढकलण्याचे धाडस करू शकले नाही. परिणामी, सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत सतराव्या क्रमांकाचे मंडळ कसेबसे महात्मा फुले मंडईपर्यंत पोहोचले, तर रांगेत मागे असलेली अनेक मंडळे रात्री आठ वाजेपर्यंत वाकडी बारवच्या पुढे सरकूच शकली नाहीत. विशेष म्हणजे बहुतांश मंडळांनी उच्च न्याययालयासह पाेलिसांनी ठरवून दिलेल्या एकूणच नियमांना तिलांजली दिल्याचे दिसून आले.
आम्हीच काय ते भरडले जायचे?
बड्या मंडळांच्या या मनमानीमुळे संतप्त झालेल्या लहान मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या धैर्याचा बांध अखेर फुटला. भोईराज मित्र मंडळाचे अध्यक्ष वैभव कांबळे आणि राजे छत्रपती मंडळाचे अध्यक्ष गणेश बर्वे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी थेट भद्रकाली पोलीस ठाणे गाठले. आम्हीसुद्धा ढोल-ताशा, साऊंड सिस्टिम आणि आरास यासाठी ६ ते ७ लाख रुपये खर्च केले आहेत. बड्या मंडळांच्या राजकीय दबावामुळे त्यांना रात्रीचा वेळ मिळतो आणि आम्हाला अवघ्या १ ते २ तासांत मिरवणूक उरकावी लागते. पोलीस प्रशासनाकडून केवळ लहान मंडळांवरच दडपशाही का केली जाते?” असा आरोप करत लहान मंडळांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला.
क्रेडिट वॉर
उत्सवाच्या निमित्ताने शहरात राजकीय ताकद दाखवण्याची स्पर्धा जुन्या नाशिकमध्ये नव्याने पाहायला मिळाली. राजकीय आश्रय असलेल्या मंडळांना मोकळे रान आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या मंडळांवर नियमांची सक्ती, या पोलिसांच्या दुटप्पी धोरणामुळे नाशिकमधील गणेशोत्सव महामंडळात उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. ऐन विसर्जन मिरवणुकीत रंगलेले हे ‘नाराजी नाट्य’ आगामी काळात शहराच्या राजकारणात कोणते नवे वळण घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.
मुद्दे
- मिरवणुकीत राजकीय वर्चस्ववाद उघड; बड्या मंडळांचा मनमानी कारभार.
- सत्ताधारी, राजकीय वजन वापरून चौकाचौकांत रेंगाळले मंडळे
- पोलिसांचे नियोजन कोलमडले.
- लाखोंचा खर्च करूनही लहान मंडळांची कोंडी
- भद्रकाली पोलीस ठाण्यात नाराजी नाट्य
- गणेशोत्सव महामंडळ, छाेटी मंडळे आणि प्रशासन आमनेसामने
- मोठ्या’ मंडळांचे लाड, लहान मंडळांचा पोलिसांवर पक्षपाताचा आरोप




