नाशिक | Nashik
उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) मंगळवारी झालेल्या जलप्रलयानंतर राज्यातील ५१ नागरिक (Citizen) अडकले असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) सात नागरिकांचा समावेश असून, त्यांच्याशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
संपर्क तुटलेल्यांमध्ये नाशिक शहरातील (Nashik City) दीपक कोतकर, शुभांगिनी कोतकर, शौनक कोतकर, शार्विल कोतकर, मालेगाव येथील सुरेश येवला, नयना येवला आणि अनिकेत येवला यांचा समावेश आहे. संबंधितांच्या कुटुंबियांनी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने (Administration) या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष दिले असून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडूनही शोध व संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपत्ती निवारण अधिकारी देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातून गेलेल्या नागरिकांची माहिती संकलित केली जात आहे. प्रशासनाकडून उत्तराखंडमधील यंत्रणांशी समन्वय साधण्यात येत असून, नागरिक सुरक्षित असल्याची खातरजमा होईपर्यंत प्रयत्न सुरू राहतील, असे स्पष्ट केले.





