नाशिक | प्रतिनिधी | Nashik
विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पाठोपाठ आता सिंहस्थ नियोजनाचे (Simhastha Kumbh Mela) पडघम वाजू लागले असून, प्रशासनाने त्याच्या तयारीला गती देण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी आज महापालिकेच्या (NMC) सिंहस्थ नियोजनाची आढावा बैठक घेतली. यापुढे सातत्याने दर मंगळवारी बैठकीत आढावा घेण्याचे निश्चित करण्यात आले.
यंदाच्या सिंहस्थात ५ लाख साधू महंत तसेच ५ कोटी भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून महापालिकेने आराखडा तयार केला आहे. या आराखड्याचे सादरीकरण जिल्हाधिकाऱ्यांसमोर करण्यात आले. हा आराखडा राज्य शासनाला सादर केला जाणार आहे. त्यात महापालिकेने कामांचे प्राधान्यक्रम ठरवत सुमारे ७ हजार कोटींचा आराखडा तयार केला असून, हा आराखडा शासनाकडे (Government) पुढील मान्यतेसाठी पाठविण्यात येणार असल्याचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी सांगितले.
निवडणूकांमध्ये सिंहस्थ कुंभमेळयाचे थंडावलेले काम आता पुन्हा सुरू झाले आहे. दर मंगळवारी कुंभमेळा नियोजनाचा आढावा घेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी घेतला आहे. त्यानुसार आज झालेल्या पहिल्या बैठकीत महापालिकेने आपला आराखडा सादर केला. २०२७च्या कुंभमेळयासाठी देशविदेशातील पाच कोटी भाविक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.साधू, महंत आखाडे, भाविकांची संख्या विचारात घेता आराखड्यात रिंगरोड, नवीन रस्ते, प्रमुख रस्त्यांची दुरूस्ती, वाहनतळ, तात्पुरते निवारागृहे, साधुग्राम आदी कामांचा सामावेश आहे.
तसेच रिंगरोडला जोडणाऱ्या २० मिसिंग लिंक जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेने रिंगरोडच्या मिसिंग लिंकच्या भूसंपादनासह सुमारे ७ हजार कोटींचा प्रारूप आराखडा तयार केला होता. गत सिंहस्थात महापालिकेच्या १०५२ कोटींच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती, मात्र यंदा अवास्तव आराखडा तयार करण्यात आल्याने कामांचे प्राधान्यक्रम ठरवून आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार आता सुमारे ७ हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
२०१५ ला असे होते नियोजन
२०१५ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यात दोन लाख साधू-महंत नाशिकमध्ये (Nashik) दाखल झाले होते. याकरीता साधुग्रामसाठी ३२७ एकर जागा आरक्षित करण्यात आली होती. यावर आखाडे आणि खालश्यांसाठी १७२९ प्लॉट पाडण्यात आले. तसेच, कुंभमेळयाच्या चार महत्वाच्या पर्वण्यांना नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी मिळून दोन कोटी भाविकांनी हजेरी लावल्याचे प्रशासनाने सांगितले. गेल्या कुंभमेळ्यात २७ किलोमीटरच्या ड्रेनेज लाईन टाकण्यात आल्या. २,००० पथदीप बसविण्यात आले. तर येणाऱ्या भाविकांसाठी ९,००० फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांना स्नानासाठी पाच किलोमीटरचे नवे घाट बांधण्यात आले होते. ९२५ दिशादर्शक फलक उभारण्यात आले होते.
२०२७ चे असे असेल नियोजन
साधूग्रामसाठी ५०० एकर जागा आरक्षित करत तीन हजार प्लॉटचे नियोजन करण्यात आले आहे. सुमारे ३ आखाडे, १,१०० खालसे यातील पाच लाख साधूंची व्यवस्था या ठिकाणी करण्याचे नियोजन आहे. तसेच, प्रत्येक पर्वणीला ८० लाख भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून पाच कोटी भाविकांचा अंदाज गृहीत धरण्यात आला आहे. येणाऱ्या भाविकांसाठी १५ हजार फिरते शौचालये, ९ नवीन पूल, ५ हजार दिशादर्शक कमानी, शहरात प्रवेश करतांना स्वागत कमानी, ३५० किलोमीटर अंतर्गत रस्ते विकास, ६० किलोमीटर बॅरेकेडिंग तसेच सेक्टर ऑफीसर, रेशन दुकाने, दुध वितरण व्यवस्था, एटीएम, बस वाहतूक आदी नियोजन करण्यात येत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा