नाशिक | प्रतिनिधी
नाशिकला होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य सचिवांच्या दालनात आज (दि. १७) सिंहस्थ कुंभमेळा आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांसमवेत विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहे. त्यांच्यासमोर सिंहस्थाच्या नियोजनाचे सादरीकरण केले जाणार आहे. त्यासाठी महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यासह जिल्हा प्रशासन, मनपा, जिल्हा परिषद, पोलिस व प्रशासनाच्या सर्वच विभागांचे प्रमुख आज मुंबईत बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाच्या विविध विभागांद्वारे आराखडे तयार करण्यात आले असून, विभागीय अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली आज राज्याच्या मुख्य सचिवांसमोर सादरीकरण केले होते. त्यावर चर्चा करण्यात आली होती. नाशिक महापालिकेने ७ हजार कोटींचा विकास प्रारुप आराखडा तयार केला असून, आयुक्त मनीषा खत्री त्यांचे मंत्रालयात राज्याच्या मुख्य सचिवांना सादरीकरण केले होते. त्यांनी त्यात काही सुचनाही केल्या होत्या. सिंहस्थात मुख्य फोकस असलेल्या रामकुंड व गोदाघाटाला असल्याने आयुक्त खत्री यांनी दोनदा सादरीकरणासाठी तेथील बारकावे जाणून घेतले. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सन २०२७ २८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे.
साधूमहंत व त्यांचे आखाडे तसेच देश-विदेशातून कोट्यवधी भाविक नाशिकला येणार आहे. त्या अनुषंगाने शासकीय यंत्रणांकडून नियोजनाला वेग आला आहे. विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी कार्यालयात दर मंगळवारी सर्व विभागांचा कुंभमेळा आराखडा व नियोजनावर बारकाईने चर्चा करीत आहेत. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक महापालिकेने पायाभूत सुविधा व विविध विकास कामांचा प्रारुप आराखडा तयार केला होता.
त्यात प्रामुख्याने साधुग्राम व पार्किंगसाठी जागा तिचे भूसंपादन यावरच साडे आठ हजार कोटींचा खर्च धरण्यात आला. अंतर्गत रिंगरोड, शहरसतील रस्ते व पूल, साधुग्राममध्ये पायाभूत सुविधा या बांधकाम विभागाशी निगडीत सहा ते सात हजार कोटींची कामे होती. वैद्यकीय, पाणीपुरवठा, विद्युत, घनकचरा संकलन, सफाई कर्मचारी आउट सोर्सिंग, ड्रेनेज, मलनिस्सारण, गोदा स्वच्छता व सुशोभीकरण आदी विभागाच्या कामांचा समावेश होता. हा आराखडा तब्बल १५ हजार कोटींवर गेला होता. त्यात राज्याच्या मुख्य सचिवांनी दिलेल्या सुचनांनुसार तब्बल आठ हजारांची कपात केली. हा आराखडा आता ७ हजार कोटींवर आला असून, आज मुख्यमंत्र्यांसमोर सादर केला जाणार आहे.
सिंहस्थासाठी प्रामुख्याने नाशिक मनपा व त्र्यंबक नगरपरिषद यजमान आहे. त्यामुळे त्यांचे आराखडे महत्वाचे आहेत. त्याशिवाय आजच्या बैठकीत पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागांचे नियोजन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम हे सादर करणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस प्रशासन उपस्थित राहणार आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा