Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : सिन्नरला साकारणार 'राष्ट्रीय कांदा भवन'; कांद्याचे जागतिक नियंत्रण येणार...

Nashik News : सिन्नरला साकारणार ‘राष्ट्रीय कांदा भवन’; कांद्याचे जागतिक नियंत्रण येणार शेतकऱ्यांच्या हातात

सिन्नर | Sinnar

जगातील पहिले आणि सर्वात मोठे ‘राष्ट्रीय कांदा भवन’ (National Onion Bhavan) तालुक्यातील जायगाव येथे उभारण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सोमवारी (दि. १५) येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. आजपर्यंत कांदा (Onion) शेती ही बिनभरवशाची व कर्जावर चालणारी शेती होती. मात्र, राष्ट्रीय कांदा भवन उभे राहिल्यानंतर कांदा शेती ही भरवशाची, शाश्वत नफ्याची आणि सुरक्षित शेती बनणार असल्याचे दिघोळे यांनी सांगितले.

- Advertisement -

राष्ट्रीय कांदा भवन हे तालुक्यातील जायगाव (Jaygaon) येथे सुरुवातीला दोन एकर क्षेत्रावर उभारण्यात येणार असून भविष्यात गरजेनुसार अधिक क्षेत्रात त्याचा विस्तार केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी अंदाजे ५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या देणगीतून उभारली जाणार आहे. भारत हा जगातील प्रमुख कांदा उत्पादक देश असतानाही आजपर्यंत कांदा आयात-निर्यात धोरण, निर्यातबंदी, नाफेड, एनसीसीएफचा बफर स्टॉक व दरनियंत्रणाचे निर्णय शेतकऱ्यांना विश्वासात न घेता घेतले जात होते. राष्ट्रीय कांदा भवन उभारल्यानंतर हे सर्व निर्णय शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतले जाणार असल्याचे दिघोळे यांनी सांगितले.

YouTube video player

‘निर्णय प्रक्रियेत शेतकरी (Farmer) सर्वोच्च स्थानी’ या तत्त्वांवर राष्ट्रीय कांदा भवन येथून नियंत्रण ठेवणार आहे. सध्या अस्तित्वात असलेली लांब व दलालयुक्त साखळी कमी करून शेतकरी राष्ट्रीय कांदा भवन देशी परदेशी ग्राहक अशी थेट कांदा विक्री व्यवस्था उभारण्यात येणार व आहे. यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत नफा तर ग्राहकांना माफक व स्थिर दरात कांदा मिळणार आहे. राज्यातून, देशातून व परदेशातून येणाऱ्या शेतकरी, व्यापारी, निर्यातदार, अधिकारी, पत्रकार, धोरणकर्ते व कांदा क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी कांदा भवन येथे राहण्याची व जेवणाची सुविधा, बैठक व परिषद कक्ष, इंटरनेट, संगणक, लॅपटॉप, कांदा टेस्टिंग लॅब यांसह सर्व आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

दरम्यान, राज्य किंवा केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या हिताविरोधात धोरणे झाली तर राष्ट्रीय कांदा भवन गप्प बसणार नाही, संवादासोबत गरज पडल्यास संघर्षही केला जाईल असे दिघोळे यांनी सांगितले. यावेळी सिन्नर युवक तालुका अध्यक्ष अरुण चव्हाण, सोमनाथ गिते, गणेश सांगळे, कैलास आव्हाड, संतोष दिघोळे, भाऊसाहेब केदार, सतिश दिघोळे, नितीन गिते, गणेश दिघोळे, सिद्धार्थ गिते, मारुती भांगरे, उत्तम आव्हाड, रामभाऊ भांगरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

कांदा शेतीचा नवा अध्याय

राष्ट्रीय कांदा भवन उभारणीमुळे शेतकऱ्यांची कांदा शेती ही कर्जावर चालणारी, अनिश्चित शेती न राहता भरवशाची, शाश्वत नफ्याची आणि भविष्य सुरक्षित करणारी शेती बनेल.

भारत दिघोळे, संस्थापक अध्यक्ष, कांदा उत्पादक संघटना

बियाणे संशोधन ते विक्रीपर्यंत नियंत्रण

राष्ट्रीय कांदा भवन येथून कांदा बियाणे संशोधन व दर्जा नियंत्रण, रोपांचे संगोपन, लागवडीनंतरची खते व औषधांचे शास्त्रीय नियोजन, उत्पादन खर्च कमी ठेवण्यासाठी सामूहिक खरेदी, पिकाची संपूर्ण निगराणी हे सर्व काम कमी खर्चात व सामूहिक पद्धतीने केले जाणार असल्याचे दिघोळे यांनी सांगितले. राज्यातील व देशातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा विक्रीचे व्यवहार पूर्णपणे पारदर्शक, कोणत्याही शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक, पिळवणूक किंवा लूट होणार नसल्याचे ते म्हणाले.

असे होतील फायदे

  • कांद्यासंबंधित सर्व निर्णय शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतले जातील.
  • निर्णय प्रक्रियेत शेतकरी सर्वोच्च स्थानी.
  • कांद्याची सध्याची लांब आणि दलालयुक्त साखळी कमी करणे.
  • राष्ट्रीय कांदा भवन थेट देशी आणि परदेशी ग्राहकांना कांदा विक्रीची व्यवस्था उभी करणार.
  • शेतकऱ्यांना शाश्वत नफा.
  • ग्राहकांना माफक आणि स्थिर दरात कांदा

ताज्या बातम्या