नाशिक | Nashik
ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्याने (Nashik District) उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या (Public Health Department) राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके (NQAS) अंतर्गत झालेल्या राज्यस्तरीय मूल्यमापनात जिल्ह्यातील आणखी ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांना गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले आहे. त्याचबरोबर ६५ आयुष्मान आरोग्य मंदिर अर्थात आरोग्य उपकेंद्रांनाही राज्यस्तरीय मानांकन प्राप्त झाले आहे.
या नव्या यशामुळे जिल्ह्यातील एकूण १६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ९१ आरोग्य उपकेंद्रे गुणवत्ता प्रमाणित झाली आहेत. नाशिक जिल्ह्यातील एकूण १०७ आरोग्य संस्थांनी NQAS मानांकन (NQAS Certification) मिळवले आहे. यामध्ये १० प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ९० आरोग्य उपकेंद्रांना राज्यस्तरीय, तर ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि एका आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय स्तरावरील मानांकन मिळाले आहे. ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने ही कामगिरी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांची उल्लेखनीय कामगिरी
नव्याने राज्यस्तरीय मानांकन मिळालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कळवण तालुक्यातील तिऱ्हळ (८७.४५ टक्के) आणि नांदुरी (८२.०४ टक्के), येवला तालुक्यातील मुखेड (८६.९७ टक्के) आणि पाटोदा (८३.४७ टक्के), तसेच सुरगाणा तालुक्यातील बूबळी (८३.७५ टक्के) आणि बोरगाव (८१.३० टक्के) या केंद्रांचा समावेश आहे.
दिंडोरी, सुरगाणा आणि सिन्नरमधील ६५ उपकेंद्रांना मानांकन
नव्याने राज्यस्तरीय मानांकन मिळालेल्या ६५ आरोग्य उपकेंद्रांमध्ये दिंडोरी तालुक्यातील ३१, सुरगाणा तालुक्यातील २८ आणि सिन्नर तालुक्यातील ६ उपकेंद्रांचा समावेश आहे. दिंडोरी तालुक्यातील खडक सुकेणे उपकेंद्राने ९३ टक्के गुण मिळवत विशेष कामगिरी केली आहे. पिंपळणारे उपकेंद्राला ८९ टक्के, तर जोपूळ, राजापूर आणि वलखेड या उपकेंद्रांना प्रत्येकी ८८ टक्के गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे आदिवासी आणि दुर्गम भागातील सुरगाणा तालुक्यातील २८ उपकेंद्रांनी ८० ते ८७ टक्क्यांदरम्यान गुण मिळवले आहेत. दुर्गम भागातही आरोग्य सेवांचा दर्जा सुधारत असल्याचे या कामगिरीतून अधोरेखित झाले आहे.
विविध निकषांवर होते गुणवत्ता मूल्यमापन
NQAS मूल्यमापनामध्ये आरोग्य संस्थांमधील स्वच्छता, संसर्ग नियंत्रण, रुग्णसेवा, औषधोपचार, उपलब्ध सुविधा आणि रुग्णांचे समाधान अशा विविध निकषांची तपासणी केली जाते. या मानांकनासाठी किमान ६५ टक्के गुण मिळवणे आवश्यक असते. राज्यस्तरीय मानांकन प्राप्त आरोग्य संस्थांना राष्ट्रीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ‘सक्षम’ (SaQsham) पोर्टलवर अर्ज करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, डॉ. हर्षल नेहेते, डॉ. दीपक लोणे, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, जिल्हास्तरीय समन्वयक डॉ. निशिगंधा महाले आणि श्री. कृष्णा भोये यांच्या समन्वित प्रयत्नांतून ही कामगिरी साध्य झाली.
नवीन राज्यस्तरीय मानांकन प्राप्त आरोग्य उपकेंद्र संस्था ( एकूण ६५)
दिंडोरी तालुका (३१ उपकेंद्रे) : दहिवी, देवसाने, फोपळवाडे, हस्ते दुमाला, जालखेड, जांबुटके, जानोरी-१, जानोरी-२, जोपूळ, करंजवण, खडक सुकेणे, कोकणगाव, कोशिंबे, लखमापूर, मडकीजांब, महाजे, मातेरेवाडी, मावडी, नळेगाव, निळवंडी, पळसविहीर, पालखेड, पिंपळणारे, पिंपरी अंचल, राजापूर, रासेगाव, रावळगाव, ठेपणपाडा, तिसगाव, टिटवे आणि वलखेड. सुरगाणा तालुका (२८ उपकेंद्रे) : आंबा पळसन, अंबाठा, आंबोडे, भवाडा, बोरगाव, बुबळी, घागबारी, हतगड, हट्टी, जाहुले, कळमणे, करंजुळ, कट्टीपाडा, खिर्डी, खोबाळा, खोकरी, खोकरविहीर, कुकुडणे, मोहपाडा, पळसन-२, प्रतापगड, रगतविहीर, राशा, साळभोये, सरड, अलंगूण, ठाणगाव आणि उंबरठाण. सिन्नर तालुका (६ उपकेंद्रे) : चास, मऱ्हळ बुद्रुक, पंचाळे, शहा, सोनांबे आणि वडांगळी.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार व सुरक्षित आरोग्य सेवा मिळणे हा आमचा प्राधान्यक्रम आहे. हे मानांकन केवळ प्रमाणपत्र नसून आरोग्य सेवांचा दर्जा सातत्याने उंचावण्याची जबाबदारी आहे. या यशात योगदान देणाऱ्या सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि जिल्हा गुणवत्ता आश्वासन पथकाचे मी अभिनंदन करतो. नागरिकांना अधिक गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे.
ओमकार पवार , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक




