नाशिक | Nashik
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Nashik APMC) सभापती देविदास पिंगळे (Devidas Pingle) हे बाजार समितीत मनमानी व हुकूमशाही पद्धतीने कामकाज असल्याच्या आरोप करत पिंगळे यांच्या पॅनलमधून निवडून आलेल्या संचालकांनी माजी सभापती शिवाजी चुंभळे (Shivaji Chumbhale) यांच्या नेतृत्वाखाली १५ संचालकांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे सोमवार (दि.०३) रोजी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्याअनुषंगाने आज (मंगळवारी) बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीत सकाळी ११ वाजता प्राधिकृत अधिकारी तथा उपजिल्हा निवडणुक अधिकारी, नाशिक डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षेतखाली व बाजार समितीचे सचिव प्रकाश घोलप यांच्या उपस्थितीत विशेष सभा पार पडत आहे. त्यामुळे बाजार समितीला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
बाजार समितीच्या २८ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या निवडणुकीत माजी खा. तथा बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली १८ पैकी १२ तर माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या नेतृत्वाखाली ६ जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे पिंगळे यांच्याकडे बहुमत असल्याने बाजार समितीत पिंगळे यांचे राज्य येऊन त्यांचा कारभार सुरू झाला होता. मात्र पुन्हा दोन वर्षांतच माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्यासह पिंगळे यांच्याच गटातून निवडून आलेल्या ९ संचालकांनी पिंगळेंच्या मनमानी कारभाराला कंटाळून त्याच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. बाजार समितीतील १८ संचालकांपैकी १५ जणांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांच्याकडे पिंगळे विरोधात अविश्वास ठराव सोमवार (ता.३) रोजी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे दाखल केला.
गेल्या काही वर्षांपासून काही ना काही कारणामुळे चर्चेत असलेल्या नाशिक बाजार समितीतील राजकारण पिंगळे यांच्यावर दाखवलेल्या अविश्वास ठराव दाखल केल्यामुळे पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. पिंगळे यांच्यावर अविश्वास ठराव (No Confidence Motion) दाखल करून चुंभळे यांनी १० संचालकांना सहलीसाठी परदेश पाठवले होते ते सोमवारी सायंकाळपर्यंत नाशकात परतले असल्याचे समजते. त्यामुळे आज शिवाजी चुंभळे यांच्यासह १५ संचालक हे बाजार समितीत अविश्वास ठरावावर विशेष सभेसाठी दाखल होणार आहेत.
पिंगळे यांच्याकडून प्रयत्न होणार?
पिंगळे आणि चुंभळे यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. पिंगळे अनेक वर्षापासून सहकार क्षेत्रात मुरब्बी नेते म्हणून ओळखले जातात. अनेक वेळा त्यांच्या राजकीय मुस्सदी पणाचा अनुभव देखील अनेकांना आला आहे. त्यामुळे पिंगळे यांच्याकडून देखील पुन्हा सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न होणार का, हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.