Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकNashik News : जुन्या किलोमीटर मोजमापाची 'पोलखोल'; एसटीच्या नव्या मीटरने सत्य समोर

Nashik News : जुन्या किलोमीटर मोजमापाची ‘पोलखोल’; एसटीच्या नव्या मीटरने सत्य समोर

चालकांना दिलासा मिळणार

नाशिक | नरेंद्र जोशी | Nashik

एसटीच्या ताफ्यात (ST Bus) नव्याने दाखल झालेल्या बीएस सहा मानांकनाच्या (BS Six Rating) गाड्यांना असलेल्या अद्ययावत ओडोमीटरमुळे किलोमीटरची निश्चित आकडेवारी समोर आली असून वर्षानुवर्षे सुरू असलेल्या जुनाट पद्धतीने मापलेल्या विविध मार्गावरील किलोमीटरची पोलखोल झाली आहे. एसटीमध्ये मोटार वाहन कामगार अधिनियम १९६१ नुसार चालकांना गाडी चालवावी लागते. त्यामध्ये आठवड्याला ४८ तास कामगिरी व दिवसाला साधारण आठ तास स्टिअरिंग ड्युटी करावी लागते. पण वाढलेले शहरीकरण, नव्याने झालेले ब्रीज, रुंदवलेल्या सीमा व रस्त्यात झालेली वेडीवाकडी वळणे, अचानक होणारे अपघात, आंदोलन, रास्ता रोको यामुळे गाड्यांची धाववेळ वाढली असून गाड्या एसटीने ठरवून दिलेल्या वेळेत कधीच पोहोचत नाहीत हे सर्वज्ञात झाले आहे.

- Advertisement -

काही मार्गावर अकरा, बारा तासांपेक्षा जास्त स्टिअरिंग ड्युटी करावी लागते. हे नियमबाह्य असून, कामाचा ताण वाढला असल्याने अनेक चालक आजारी पडतात. याशिवाय चालकांना (Driver) शारीरिक व मानसिक त्रास होतो. त्यामुळे मुख्य रस्त्यांचे मार्ग सर्व्हेक्षण करण्यात आले पाहिजे व सुरू असलेली जीवघेणी कामवाढ रद्द करण्यात आली पाहिजे. त्याचप्रमाणे काही मार्गावर नवीन ओडोमीटरमधील धाववेळेप्रमाणे अतिकालिक भत्ता देण्यात आला पाहिजे, ही मागणी आता पुढे आली आहे. एसटीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या बीएस ६ गाड्यामधील ओडोमीटर हे निश्चित आकडेवारी दाखवित असल्याने एसटीच्या जुनाट पद्धतीने दाखविल्या जात असलेल्या किलोमीटरची पोल खोल झालेली असून चालक वाहकांची आर्थिक व शारीरिक पिळवणूक थांबण्यासाठी निश्चित रस्ता सापडला आहे.

YouTube video player

विदर्भातील (Vidarbha) काही मार्गावर तपासणी केली असता याबाबत असे समोर आले आहे की, एसटीने ठरवून दिल्यानुसार वणी ते परतवाडा मार्गावर जाणे व येणे असे एकूण ५०० कि.मी. दर्शविण्यात येतात. परंतु नवीन मीटरमध्ये या फेरीचे जाता येता अंतर हे ५३४ कि.मी. दिसून आले आहे. याचप्रमाणे वणी ते अकोला या मार्गावर ५२७कि.मी. नोंद केले जात असून नवीन मीटरमध्ये मात्र प्रत्यक्षात ५६२ कि.मी. होत आहेत. वणी ते नागपूर याचे अंतर २६९ कि.मी. नोंदविले जात असून हे अंतर नवीन बसेसच्या मीटरनुसार २८६ कि.मी. असे दाखविण्यात आले आहे.

दरम्यान, याचाच अर्थ एसटीकडून जादा काम करून घेण्यात येऊन आवश्यक तेवढी धाववेळ दाखवली नसल्याने चालकांचे शारीरिक आणि आर्थिक शोषण केले जात आहे. त्यामुळे एसटीने कधी काळी मापलेले विविध मार्गावरील किलोमीटर हे चुकीचे असल्याचे दिसून येत असून नव्या गाड्यामधील (Car) ओडोमीटर प्रमाणे किलोमीटर गृहीत धरून चालकांची धाववेळ निश्चित करण्यात येऊन त्यांच्यावर होत असलेला अन्याय दूर करण्यात यावा अशी मागणीही पुढे आली आहे. भविष्यात त्यामुळे चालकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

नवीन गाड्यांना फिट असलेल्या मीटरमध्ये दाखवत असलेल्या किलोमीटरप्रमाणे फेर मार्ग सर्वेक्षण करण्यात येऊन चालकांना झालेली कामवाढ रद्द करण्यात यावी व त्यांची आर्थिक व शारीरिक पिळवणूक थांबवावी.

श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

बाबा आझमच्या काळातील नियम अजूनही एसटीत सुरू असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. नाशिक ते त्र्यंबक ३५ मिनिटांत बस पोहोचली पाहिजे असा नियम आहे. मात्र कोणतीही बस एक तासापेक्षा कमी वेळेत पोहोचत नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालकांना नाशिक ते त्र्यंबक तीन-चार फेऱ्या केल्याच पाहिजे, असा नियम लादला आहे. त्यामुळे चालक-वाहकांना रोज बारा तासांच्या वरच ड्यूटी करावी लागते. नवीन पद्धतीने आता मोजमाप झाल्याशिवाय तरणोपाय नाही.

सुभाष जाधव,संघटक सचिव, एसटी कामगार

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...