नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरातील काठेगल्लीमधील (Kathe Galli) एका धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटवण्याच्या काही तासआधीच पखालरोड व उस्मानिया कॉर्नर येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास तीन हजारांच्या अनियंत्रित जमावाने पोलिसांवर (Police) दगडफेक केली. या घटनेत पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमाव नियंत्रित केला. या दगडफेकीत २१ पोलीस जखमी झाले असून ३० संशयितांना (Suspected) ताब्यात घेण्यात आले आहे.
सद्यपरिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला असून घटनास्थळावरून परजिल्ह्यासह मालेगावातील १०८ संशयास्पद दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. त्यामुळे ही दंगल पूर्वनियोजित कट रचून घडवल्याचे प्राथमिक पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. हल्लेखोरांकडे मोठ्या प्रमाणात दगड कोठून आले, यामागे कोण आहे, याचा शोध सुरु केला आहे, असे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सिव्हील हॉस्पिटलच्या भेटीनंतर सांगितले. काठेगल्ली भागातील धार्मिकस्थळ हटवण्यासाठी उच्च न्यायालयाने (High Court) महापालिकेस आदेश दिले होते. त्यानंतर मनपाने या स्थळासह कृटींना नोटीस दिली होती.
विहित मर्यादित अतिक्रमण हटविले नसल्याने मनपाने मंगळवारी रात्री १० वाजेपासून कार्यवाही सुरु केली. काठेगल्ली व इतर भागात बॅरिकेडिंग लागताच काही संशयित पखालरोड व उस्मानिया चौकात जमले. बघताबघता हा जमाव ३ हजारांच्या संख्येने जमला. यानंतर पोलिसांनी जमावास शांततेचे आवाहन केले असता, अचानक काही संशयितांनी गर्दीतून व काही सोसायट्यांच्या बिल्डिंगवरून अंदाधुंद दगडफेक व काचेच्या बाटल्यांचा मारा सुरु केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलीस आयुक्त किरणकुमार चव्हाण (Kirankumar Chavan) व सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
दरम्यान, तणाव निवळल्यानंतर पोलिसानी पॉईंटसवर बंदोबस्त तैनात केला. यानंतर विविध पोलीस ठाणे (Police Station) व युनिट्सने धाडसत्र राबवून ३० हून अधिक संशयितांना ताब्यात घेतले.संशयितांकडे व इतर पसार झालेल्यांकडे मिळालेल्या या बेवारस दुचाकी मालेगाव, धुळे व अन्य भागातील असल्याचे तपासात समोर येत आहे. या घटनेत स्थानिकांपेक्षा परगावातील संशयितांचा भरणा जास्त आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, जखमी पोलीस अधिकारी, अंमलदारांची शिक्षणंमत्री दादा भुसे, आ. देवयानी फरांदे , पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी भेट घेऊन आस्थेने विचारपूस केली.
सखोल तपास सुरू
या घटनेचा सखोल तपास केला जात असून ही घटना म्हणजे पूर्वनियोजित कट होता का? कसा व कुणी रचला यादिशेने तपास सुरू झाला आहे. तसे प्राथमिक पुरावे गुन्हे शाखा व तपास पथकास मिळाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार, संशयितांची धरपकड सुरू असून १०८ दुचाकी कोणाच्या आहेत? त्यांचे मूळ मालक कोण? दगडफेक सुरू असताना वीज का नव्हती? ती खंडित करण्यात आली की तांत्रिक बिघाड झाला, यासाठी महावितरणकडे चौकशी केली जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
नाशिक महापालिकेने दर्गावर केलेली कारवाई ही अनधिकृत आहे. त्यासाठी न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाने आज आम्हाला त्याच्यावर स्थगिती दिली आहे. आमच्याकडे ३०० वर्षे जुने कागदपत्र असून आम्ही ते न्यायालयात सादर केले. पुढील सुनावणी २१ एप्रिला होणार आहे, अशी माहिती कमिटीचे फहीम शेख यांनी दिली. मनपाने दर्यावर लावलेल्या नोटीसीबाबत दर्गा विश्वस्त मंडळाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर सर्वोच न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तीच्या खंडपीठांसमोर सुनावणी होऊन मनपाच्या त्या नोटीसीला स्थगिती दिली.