नाशिक | प्रतिनिधी
महापालिकेच्या पाणीपट्टी महसुलात पारदर्शकता आणण्यासाठी आणि नागरिकांकडून अचूक वसुली होण्यासाठी पाणीमीटर सर्वेक्षण करण्यात आले आहे. या पाहणीत मीटरबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील १,४९,४०९ घरांची पाहणी करण्यात आली. त्यात तब्बल ३५ हजार ठिकाणी पाणीमीटरच नाहीत किंवा ते पूर्णपणे नादुरुस्त असल्याचे समोर आले आहे.
कॅनबेरी कंपनीमार्फत सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. तर आता दुसऱ्या टप्प्याची कामे हाती घेण्यात आली आहे. यामध्ये विविध कारणांनी रीडिंग घेता न आल्याचेही निदर्शनास आले आहे. काही मीटर बंद दारामागे, काही जमिनीत गाडलेले, काही चोरीस गेलेले, तर काही मीटर पूर्णपणे निकामी झालेले आढळले आहेत. शहरातील पाणी गळती, चोरी आणि अपव्ययाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात स्पष्ट झाले आहे. पूर्वी अंदाजावर दिल्या जाणाऱ्या पाणीपट्टी बिलांच्या तुलनेत आता स्पॉट बिलिंग प्रणालीमुळे अचूक रीडिंग घेऊन त्वरित बिल वितरित करण्यात येत आहे.
या उपक्रमामुळे केवळ मनपाच्या महसुलात वाढ होणार नाही, तर नागरिकांनाही त्यांच्या पाणीवापराचा अचूक हिशेब मिळेल. आगामी काळात सर्व नळजोडण्यांवर कार्यरत मीटर बसविण्याचे उद्दिष्ट मनपाने ठेवले आहे. शहरातील प्रत्येक नळजोडणीचे वास्तव रीडिंग मिळवणे हे उद्दिष्ट असून, जिथे मीटर नाही किंवा नादुरुस्त आहेत तिथे नवीन मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
नळमीटर तपासणी अहवाल
मीटर स्थिती घर संख्या
कार्यरत ४६,२०७
रीडिंग दिसत नाही १४,८७१
भूमिगत १२,०५४
दरवाजा बंद ९,६२१
फोटो घेता आला नाही ८,८६६
नॉन-मीटर ८,४३५
नादुरुस्त ८,३५५
स्मार्ट मीटर २,३०३
जड चेंबरखाली १,८४४
मीटर डिसकनेक्ट १,०४८
मीटर चोरीला गेले ६९८
उलटे जोडलेले ९३
तात्पुरते बंद १४
मीटरच नाही ३५,०००
एकूण तपासणी १,४९,४०९
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




