नाशिक | Nashik
केंद्र सरकारने (Central Government) कांद्यावरील (Onion) लागू केलेले २० टक्के निर्यात शुल्क तात्काळ रद्द करून शून्य टक्के करावे या मागणीसाठी आणि सातत्याने कांद्याचे भाव कोसळत असल्यामुळे आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत (Lasalgaon APMC) संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव पाडले. यावेळी केंद्र सरकारच्या कांदा निर्यात धोरणाविरोधात शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून आले.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी ९ वाजता कांद्याचे लिलाव (Onion Auction) सुरु झाले होते. यावेळी कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी (Farmer) कांद्याचे लिलाव काही काळासाठी बंद पाडले.यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.लासलगावसह देशांतर्गत कांद्याची मोठी आवक विक्रीसाठी दाखल होत असल्याने लासलगाव बाजार समितीत गेल्या दहा दिवसात कांद्याच्या बाजारभावात पंचवीसशे रुपयांची मोठी घसरण झाली आहे.
दरम्यान, यामुळे कांद्याचे सरासरी बाजारभाव सोळाशे ते सतराशे रुपयापर्यंत कोसळल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहे. त्यामुळे आज शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत विक्री झालेल्या कांद्याला एक हजार ते दोन हजार रुपये अनुदान देण्याची मागणी (Demand) केली. तसेच आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळच्या सत्रात ८०० वाहनातून कांद्याची आवक दाखल झाली होती. या कांद्याला जास्तीतजास्त २५०१ रुपये, कमीतकमी ५०० रुपये तर सरासरी १७०० रुपये प्रतिक्विंटलला बाजारभाव मिळाला. मात्र, दररोज होणाऱ्या कांद्याच्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.