नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्हा परिषदेच्या ७४ गट आणि पंचायत समितीच्या (Zilla Parishad and Panchayat Samiti) १४८ गणांसाठी १३ ऑक्टोबर रोजी काढण्यात आलेली आरक्षण (Reservation) सोडत अंतिम झाली आहे. या सोडतीवर दाखल झालेल्या एकूण ४८ हरकती विभागीय आयुक्तांनी फेटाळल्या असून, अंतिम आरक्षण सोमवारी (दि. ३) राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले. त्याचबरोबर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी अंतिम मतदार याद्याही सोमवारी जाहीर करण्यात आल्या आहेत.
आरक्षण व मतदार यादी (Voter List) अंतिम झाल्याने आता इच्छुक उमेदवारांच्या निवडणूक तयारीला वेग येणार असून, लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आरक्षण सोडतीबाबत जिल्हा परिषदेकडे ४१ तर पंचायत समिती गणांसाठी ७ अशा एकूण ४८ हरकती दाखल झाल्या होत्या. काही गटांवर अन्याय झाल्याचा दावा करीत फेरआरक्षणाची मागणी करण्यात आली होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector) हरकतींचा गोषवारा अभिप्रायासह विभागीय आयुक्तांना सादर केल्यानंतर ३१ ऑक्टोबरपर्यंत सर्व हरकती निकाली काढण्यात आल्या.
दरम्यान, सर्व हरकती फेटाळल्यानंतर प्रारूप आरक्षण सोडत अंतिम स्वरूपात राजपत्रात प्रकाशित करण्यात आली. या याद्या जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सर्व तालुक्यांतील तहसील कार्यालयांवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. १२ नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रांची यादी (List of Polling Booth) आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
मतदार यादी कार्यक्रम
राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून, त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी आधारभूत मानली जाणार आहे. प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाली होती. हरकती व सूचना १४ ऑक्टोबरपर्यंत स्वीकारल्या गेल्या. नियोजित वेळेनुसार अंतिम यादी २७ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाच्या उपसचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी सात दिवसांची मुदतवाढ दिल्याने अंतिम मतदार याद्या सोमवारी (दि.३) जाहीर झाल्या.




