नाशिक | Nashik
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा काढण्यात आली. यानिमित्त शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हुतात्मा स्मारक येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा क्रीडाधिकारी सुनंदा पाटील, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा समाजविद्याप्रसारक संस्थेच्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी लेझीम, लाठी- काठी नृत्य सादर केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (Jayanti) शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नेहरू युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना, मराठा विद्या प्रसारक समाज, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, नाशिक यांच्यातर्फे नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या मराठा हायस्कूल येथून ‘जय शिवराय जय भारत’ पदयात्रेला (Jai Shivaji Jai Bharat’ Padayatra) सुरुवात झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी वाघ, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पाटील, मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड. ठाकरे आदी उपस्थित होते. ॲड. ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector’s Office) आज सकाळी प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम झाला. अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलावळे (प्रशासन), जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार, उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे, तहसीलदार मंजुषा घाटगे, शोभा पुजारी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.