नाशिक | Nashik
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) टाके देवगाव येथील नवजात बाळाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर रुग्णवाहिका न मिळाल्याने आई-वडीलांना मृतदेह तब्बल ६० किलोमीटर प्रवास करत मोटारसायकलवरून (Motorcycle) गावाकडे नेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे प्रशासकीय यंत्रणेचा असंवेदनशीलपणा समोर आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगावपैकी (Take Devgaon) बर्ड्याची वाडी येथील संगीता राहुल मेंगाळ या गर्भवती महिलेला गुरुवारी (दि.१) रोजी नाशिक जिल्हा रुग्णालयात (Nashik Civil Hospital) प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजता तिने बाळाला जन्म दिला. मात्र, सकाळी ११ वाजता उपचारादरम्यान नवजात बाळाचा मृत्यू झाला.
त्यानंतर मृत बाळाला अंत्यविधीसाठी घरी घेऊन जाण्यासाठी आई-वडिलांनी वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी रुग्णालय प्रशासनाकडे केली असता अशा प्रकारे वाहन (Vehicle) देता येत नाही, असे उत्तर दिल्याचा आरोप नवजात बाळाच्या पालकांनी केला आहे. यानंतर खासगी रुग्णवाहिकेसाठी पैसे नसल्याने आई-वडिलांनी दुचाकीवरून बाळाचा मृतदेह घरी नेला. तर आईला उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नियम काय सांगतो?
भारत सरकारच्या ‘जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम’ अंतर्गत एक वर्षापर्यंतच्या आजारी बालकांना शासकीय रुग्णालयात मोफत उपचार, तसेच घरून रुग्णालयात आणि रुग्णालयातून घरी जाण्यासाठी मोफत वाहतूक सुविधा दिली जाते. या काळात दुर्दैवाने बालकाचा मृत्यू झाल्यास मृतदेह सन्मानाने घरी पोहोचवण्यासाठी शासकीय रुग्णालयांनी मोफत व्यवस्था करणे बंधनकारक आहे. मात्र,टाके देवगाव येथील दाम्पत्याला ही सुविधा मिळाली नाही. त्यामुळे त्यांना मोटारसायकलवरून नवजात अर्भकाचा मृतदेह न्यावा लागला.
शासकीय शववाहिनी प्रत्येक जिल्हा रुग्णालय किंवा मोठ्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह वाहून नेण्यासाठी मोफत उपलब्ध असते. मात्र आज एका आई-वडिलांना स्वत:च्या मोटारसायकलवरून ६० किलोमीटर अंतर प्रवास करत आपल्या बाळाचा मृतदेह घरी नेण्याची वेळ आली. या योजनेपासून वंचित ठेवणार्या अधिकार्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच ज्या अधिकाऱ्याने रुग्णवाहिका नाकारली त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा.
भगवान मधे, अध्यक्ष, एल्गार कष्टकरी संघटना
दुर्गम आदिवासी भागात मृतदेह न्यायचा असेल तर जिल्हा आरोग्य विभागाद्वारे शववाहिका उपलब्ध करून देण्यात येते. मात्र आमच्याकडे त्या नवजात बाळाच्या कुटुंबाने शववाहिकेची मागणी केली नाही. केली असती तर शववाहिका उपलब्ध करून दिली असती.
डॉ. सतीश शिंपी, जिल्हा शल्य चिकित्सक




