Thursday, January 29, 2026
Homeमुख्य बातम्याNashik News : सप्तशृंग घाटातील प्रवास 'भगवती भरोसे'; पावसामुळे रस्ता काँक्रिटीकरण रखडले,...

Nashik News : सप्तशृंग घाटातील प्रवास ‘भगवती भरोसे’; पावसामुळे रस्ता काँक्रिटीकरण रखडले, कथड्यांची दुरावस्था

नाशिक | सोमनाथ ताकवाले | Nashik

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगीदेवीच्या (Saptashrungi Devi) दर्शनासाठी जाताना भाविकांना (Devotees) घाटमार्गातील अडथळ्यांची शर्यत पार करत प्रवास करावा लागत आहे. सप्तशृंग घाट (Saptashrung Ghat) मार्गाच्या स्वागत कमानीपासून ते गडावर ग्रामपंचायतीच्या कर नाक्यापर्यंतच्या मार्गादरम्यान खड्डे, तुटलेले कथडे, कॉक्रिटीकरणाचे रखडलेले काम, सूचनादर्शक फलकांचा अभाव आणि खचलेला मार्ग अशी धोकादायक स्थिती आहे. यामुळे अपघाताची शक्यता आहे. देवीच्या दर्शनाची आस घेऊन निघालेल्या भाविकांना सुरक्षेअभावी घाटातील प्रवास ‘भगवती भरोसे’ करावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.

- Advertisement -

गडावर (Gad) आगामी नवरात्रोत्सव, दसरा, कोजागिरी पौर्णिमा, दिवाळी सुट्या, तसेच इतर दिनविशेष दरम्यान भाविकांचा सतत राबता असणार आहे. यात्रा काळात २०ते २५ लाख भाविकांची हजेरी गडावर असते. यात्रा काळात खासगी वाहनांना प्रवेश बंदी असली तरी इतरवेळी खासगी वाहनांची रहदारी गडावर मोठ्या प्रमाणात आहे. सध्या आषाढ मास सुरू असल्याने देवीच्या दर्शनासाठी मंगळवार, शुक्रवार या दिवशी प्रचंड गर्दी आहे. शनिवार, रविवार या दिवशीही भाविकांची गर्दी वाढलेली आहे. त्यामुळे घाटातून जाणाऱ्या वाहनांची (Vehicles) संख्या अधिक आहे.

YouTube video player

रखडलेल्या कामामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. त्यात खबरदारीच्या सूचना देणाऱ्या फलकांचा अभाव असल्याने वाहनचालकांना अंदाजे मार्गक्रमण करत पुढे सरकावे लागते. रस्ता काँक्रिटीकरणाचे काम जागोजागी अर्धवट असल्याने तसेच त्यांच्या लोखंडी सळ्या बाहेर आल्याने वाहनचालकांना घाटाच्या दरीच्या बाजूने डांबरी रस्त्यांच्या एका लेनवरून वाहने चालवत घाट उतरावा लागतो. डांबरी रस्त्यांवर अस्तर उखडलेले आहे. जागोजागी खड्डे पडलेले. काँक्रीटीकरण कामामुळे त्याच्या दुरूस्तीचे काम होत नाही. कथड्याकडील भराव खचलेला आहे. यामुळे वाहनांना अपघात (Accident) होण्याची शक्यता असल्याची प्रतिक्रिया वाहनचालकांनी दिली.

मे महिन्यापासून सप्तश्रृंगघाटात ९ किलोमीटर अंतरादरम्यान ४० कोटी रुपये खर्चुन बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, महावितरण या विभागाकडून रस्त्याचे काँक्रिटीकरण, सुरक्षा कथड्यांची व्यवस्था, कोसळणाऱ्या दरडींना अटकाव घालणाऱ्या संरक्षक जाळ्या बसवणे आदी कामे करण्यात येत आहेत. मात्र, पावसाने मे महिन्यापासूनच हजेरी लावलेली आहे. त्यात गडावर कोसळणारा पाऊस (Rain) इतर भागापेक्षा सर्वाधिक असतो. दिवसा धुक्यामुळे विकासकामांना खीळ बसल्याचे शासकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, असे असले तरी, कामे करत असताना भाविकांच्या सुरक्षेकडे घाटात दुर्लक्ष झाल्याची तक्रार वाहनचालक, भाविक करताना दिसत आहे. कारण घाटात अवघड वळण, तुटलेले कथडे, कोसळणारे दगड आदी धोकादायक ठिकाणांना सूचना किंवा खबरदारी घेणाऱ्या फलकांची गरज आहे.

भाविकांची गैरसोय

शासनाकडून करण्यात येत असलेले काम रखडलेले आहे. ग्रामपंचायत हद्दीत गटारीचे काम करण्यासाठी जागोजागी रस्ता खोदल्यामुळे गल्लीबोळात खालीवर झालेला मार्ग, चिखलाचे साम्राज्य, अधर्वट दगडी काम झालेले आहे. गडावर देवीच्या मंदिराचे काम सुरू आहे. गाभान्याच्या परिसरात अस्वच्छता आहे. तेथील प्रसाधनगृहांची दुर्गंधी मंदिर परिसरात वाढलेली आहे. गाभाऱ्यात पेडदर्शन, रोपवे आणि पायरी मार्गाने येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे नियोजन कोलमडलेले आहे. याकडे ट्रस्टचे दुर्लक्ष आहे, असे भाविकांचे म्हणणे आहे. शासन, ग्रामपंचायत आणि ट्रस्टने समस्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे.

सप्तशृंग घाटात रस्ता काँक्रिटीकरण, सुरक्षा कथड्यांचे मजबुतीकरण, दरडींना संरक्षक जाळ्या बसवणे ही कामे भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहेत. मात्र मे महिन्यापासूनच पाऊस सुरू झाल्याने कामांना अडथळा येत आहे. नवरात्रोत्सवापूर्वी घाटातील कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे.

श्रीमती वसावे, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

ताज्या बातम्या

पडसाद : कणखर प्रशासकाची अकाली एक्झिट

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे- दै. 'देशदूत' - संपादक प्रमोद महाजन (२००६), विलासराव देशमुख (२०१२), गोपीनाथ मुंडे (२०१४) आर. आर. पाटील(२०१५) आणि आता अजितदादा पवार.. महाराष्ट्राने...