Monday, September 28, 2026
HomeनाशिकNashik News : गर्भवती महिलेच्या सुनावणीसाठी SIR टीम पोहचली थेट घरी; दिंडोरी...

Nashik News : गर्भवती महिलेच्या सुनावणीसाठी SIR टीम पोहचली थेट घरी; दिंडोरी निवडणूक प्रशासनाच्या संवेदनशील कार्यपद्धतीचा आदर्श

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

शासकीय कामासाठी नागरिकांनाच सरकारी कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागतात, हे आपण समाजामध्ये बघत असतो. मात्र, या रूढ प्रतिमेला छेद देणारी एक अत्यंत कौतुकास्पद आणि मानवी संवेदनशीलतेची घटना नाशिकमध्ये (Nashik) समोर आली आहे. निवडणूक आयोगाच्या विशेष पुनरीक्षण (SIR) अभियानांतर्गत दाव्यांवरील सुनावणीसाठी एका गर्भवती महिलेला (Pregnant Woman) दिंडोरी नगरपंचायत कार्यालयात उपस्थित राहण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र, तिची वैद्यकीय अडचण ओळखून प्रशासकीय पथकाने स्वतः तिच्या नाशिक येथील घरी पोहोचून सुनावणीची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.राज्यात घडलेले हे अशा प्रकारचे पहिले व अनोखे उदाहरण ठरले असून, प्रशासनाच्या या कर्तव्यदक्षतेचे आणि तत्परतेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

- Advertisement -

प्रवासाचा धोका लक्षात घेऊन अधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

निवडणूक आयोगाच्या विशेष पुनरीक्षण (SIR) अभियानांतर्गत स्वामिनी सुधीर घोरपडे यांना दिंडोरी नगरपंचायत कार्यालयातील (Dindori Nagarpanchyat Office) सुनावणी केंद्रावर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, त्या गर्भवती असून त्यांच्यावर नाशिक (Nashik) येथे वैद्यकीय उपचार सुरू होते. प्रकृतीच्या कारणास्तव नाशिक ते दिंडोरी असा प्रवास करणे त्यांच्यासाठी अशक्य आणि आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक होते. ही अडचण लक्षात येताच दिंडोरी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी संदीप चौधरी यांनी याप्रकरणी पुढाकार घेतला. त्यांनी तत्काळ नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद आणि उपविभागीय अधिकारी (दिंडोरी) आप्पासाहेब शिंदे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली आणि विशेष परवानगी मिळवली.

दिंडोरीहून नाशिक गाठून घरीच केली सुनावणी

वरिष्ठांची परवानगी मिळताच प्रशासकीय पथकाने निवडणूक आयोगाचे नियम आणि नागरिकांची (Citizen) सोय यांचा योग्य मेळ घातला. या टीमने स्वतः दिंडोरीहून नाशिक गाठले आणि स्वामिनी घोरपडे यांच्या घरी जाऊन सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत सुनावणी पार पाडली.या विशेष पथकामध्ये दिंडोरीचे मुख्याधिकारी संदीप चौधरी, पर्यवेक्षक व प्रशासकीय अधिकारी (BLO) विजय देवरे, जयराम राठोड आणि संगणक प्रचालक श्वेताली आहेर यांचा समावेश होता.

घोरपडे कुटुंबाकडून प्रशासनाचे आभार

प्रशासनाने दाखवलेल्या या मानवी दृष्टिकोन व तत्परतेमुळे स्वामिनी घोरपडे यांच्यासह संपूर्ण कुटुंबाने (Family) भावूक होत निवडणूक अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. “शासकीय अधिकाऱ्यांनी दाखवलेली ही संवेदनशीलता आमच्यासाठी अत्यंत दिलासादायक ठरली,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. प्रशासनाच्या या कामगिरीमुळे सरकारी यंत्रणेवरील जनतेचा विश्वास आणखी दृढ झाला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दुष्काळामुळे जिल्हा बँकेची आर्थिक कोंडी आणखी वाढणार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar कर्जमाफीच्या घोषणेमुळे गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक अडचणींचा सामना करणार्‍या नगर जिल्हा सहकारी बँकेच्या अर्थकारणावर यंदाच्या दुष्काळाचेही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्य...