नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राज्यातील समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आणि प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर (National Highway) सतत होणारे भीषण अपघात (Accident) लेन कटिंग, अतिवेग आणि चालकांचा निष्काळजीपणा रोखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय झाला आहे. महामार्ग सुरक्षा पथकातील १,१०१ कर्मचाऱ्यांना पुढील ६ महिन्यांसाठी मुदतवाढ मंजूर करण्यात आली आहे. ही मुदतवाढ केवळ कागदोपत्री प्रशासकीय प्रक्रिया नसून, राज्यातील महामार्गांवर (State Highway) प्रत्यक्ष २५ हून अधिक जिल्ह्यांत पोलीस दल २४ तास सक्रिय ठेवण्याच्या दृष्टीने निर्णायक मानली जात आहे.
महामार्गांवर होणाऱ्या अपघातांमध्ये (Accident) अतिवेग आणि चुकीच्या पद्धतीने गाड्या ओव्हरटेक करणे (लेन कटिंग) ही मुख्य कारणे आहेत. या १,१०१ पदांमध्ये केवळ अधिकारीच नव्हे, तर शेकडो हवालदार, पोलीस शिपाई आणि चालक यांचा समावेश आहे. यामुळे स्पीड गन आणि आधुनिक ट्रॅफिक कंट्रोल यंत्रणेसह पोलीस पथके महामार्गांवर सातत्याने गस्त घालू शकतील. नाशिक-पुणे, मुंबई, नाशिक गुजरात, दिव-दमन या मार्गांसह खंडाळा, बोरघाट व अन्य धोकादायक वळणांवर अपघातांची शक्यता अधिक असते. त्यामुळे बोरघाट आणि चिंचोटी भागातील क्रेन चालक व तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या पदांचाही समावेश आहे.
त्यामुळे अपघात घडल्यास किंवा वाहन नादुरुस्त झाल्यास रस्ता मोकळा करण्यासाठी आणि जखमींना वेळेत वैद्यकीय मदत पोहोचवण्यासाठी या पथकाचा थेट फायदा होणार आहे. सप्टेंबर ते फेब्रुवारी या सहा महिन्यांच्या कालावधीत गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी आणि वर्षा अखेरच्या सुट्ट्या येतात. या काळात महामार्गांवरील वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढते. १,१०१ कर्मचाऱ्यांच्या या ताफ्यामुळे सणासुदीच्या काळात वाहतूक कोंडी नियंत्रण आणि सुरक्षेचे नियोजन अधिक सक्षमपणे करता येईल. जर ही मुदतवाढ वेळेत मिळाली नसती, तर महामार्गांवरील गस्त यंत्रणा आणि क्रेन सेवा ठप्प झाली असती. शासनाच्या या निर्णयामुळे आगामी सणासुदीच्या काळात महामार्गांवरील सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापन अबाधित राहणार आहे.
नाशिकसह ग्रामीण भागातील महामार्गांवर गस्त
नाशिक (ग्रामीण), अहमदनगर, धुळे, जळगाव, पुणे (ग्रामीण), ठाणे आणि रायगड या महत्त्वाच्या जिल्ह्यांतील महामार्ग सुरक्षा केंद्रांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. नाशिक ग्रामीण अंतर्गत १०९ पदे, पुणे ग्रामीण ११५ पदे तर ठाणे ग्रामीण १७१ पदे या निर्णयामुळे सक्रिय राहणार आहेत.
पदनिहाय उपलब्धता
एकूण मुदतवाढ दिलेली पदे : १,१०१
कालावधी : १ सप्टेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७
प्रमुख पदे : अपर पोलीस महासंचालक (१), पोलीस अधीक्षक (३), पोलीस उपअधिक्षक (३), पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, हवालदार, पोलीस शिपाई, चालक व तांत्रिक मदतनीस.
जिल्हे
नाशिक (१०९), पुणे ग्रामीण (११५), ठाणे ग्रामीण (१७१), अहमदनगर (५१), जळगाव (३६), धुळे (२२), औरंगाबाद/छत्रपती संभाजीनगर (४१), रायगड (३४), अमरावती (४२), नांदेड (३६).




