Tuesday, November 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी गड देवस्थानांना धमकीचा ई-मेल; पोलीस बंदोबस्तात वाढ

Nashik News : त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी गड देवस्थानांना धमकीचा ई-मेल; पोलीस बंदोबस्तात वाढ

नाशिक | Nashik

ऐन दिवाळीच्या (Diwali) सण-उत्सवाच्या काळात नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) प्रसिद्ध धार्मिक स्थळे असलेल्या त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी गड देवस्थानांना नुकसान पोहोचवण्याच्या संदर्भातील धमकीचा ई-मेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या धमकीच्या ई-मेलची (E Mail) तत्काळ गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने दोन्ही मंदिरांसह नाशिक शहरातील ऐतिहासिक काळाराम मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ केली आहे. नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी या धमकीच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे.

- Advertisement -

गेल्याच आठवड्यात नाशिक जिल्हा न्यायालयालाही (Court) अशाच प्रकारचा धमकीचा ई-मेल आला होता. सुदैवाने त्यात काहीही निष्पन्न न झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र, ती घटना ताजी असतानाच आता लाखो भाविकांची श्रद्धास्थाने असलेल्या त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी गड मंदिरांबाबत असा संदेश प्राप्त झाल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची कठोर पावले

त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी गड परिसरात प्रत्येकी ५० हून अधिक पोलीस (Police) कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.मंदिरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक भाविकाची आणि त्यांच्या वस्तूंची बारकाईने तपासणी करूनच त्यांना सोडले जात आहे.मंदिराच्या संपूर्ण परिसरावर आणि सीसीटीव्ही (CCTV) फुटेजवर पोलीस यंत्रणा बारीक लक्ष ठेवून आहे. तसेच शस्त्रधारी पोलीस अधिकारी सुरक्षेसाठी पहारा देत आहेत.

उच्चस्तरीय चौकशी सुरू

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या धमकीच्या ई-मेलचा मजकूर आणि स्त्रोताबाबत गुप्तता पाळण्यात आली असून वरिष्ठ पातळीवर याची सखोल चौकशी सुरू आहे. राज्यातील काही अन्य प्रमुख देवस्थानांनाही अशाच प्रकारचे ई-मेल आल्याची माहिती समोर येत आहे.

पोलीस प्रशासनाचे आवाहन

भाविकांची गर्दी लक्षात घेता या धमकीच्या ई-मेलची अतिशय गंभीर दखल घेण्यात आली आहे. नागरिकांनी आणि भाविकांनी अजिबात घाबरून न जाता शांतता राखावी व आपले देवदर्शन पूर्ववत सुरू ठेवावे. पोलीस प्रशासन जनतेच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे कटिबद्ध असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे, असे आवाहन नाशिकचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी केले आहे.

ताज्या बातम्या