वणी | दुर्गेश दायमा | Vani
उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर (Saptashrungi Gadh ) दिवाळी सुट्टीची परवणी साधत सुमारे दोन लाखाहून अधिक भाविक सप्तशृंगी चरणी नतमस्तक झाले. गेल्या दोन दिवसांपासून गडावरती भाविकांची (Devotees) मांदियाळी बघावयास मिळत आहे. शुक्रवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली.
सप्तश्रृंग घाट रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी (Trafic Jam) झालेली बघावयास मिळाली. तर खाजगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने दोन किलोमीटर अगोदरच वाहने थांबवावी लागली. यानंतर तेथून भक्तांना पायपीट करावी लागली. दीपावली यात्रा सुट्टीच्या दरम्यान भक्तांना देवीचे दर्शन मध्यरात्रीपर्यंत घेता येत असल्याने भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करीत होते. याच कालावधीत मात्र रात्रीच्या वेळेस एस.टी. महामंडळ देखील झोपेतच होते.
या गर्दीच्या कालावधीत त्यांनी देखील पुरेशा एसटी बसेस उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या उत्पन्नात निश्चित भर पडेल अशी प्रतिक्रिया भक्तांनी दिली. दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेतांना पर्यटकांनी व भाविकांनी दिंडोरी येथील स्वामी समर्थ केंद्र, दत्तात्रेयांचे आजोळ असलेल्या श्री क्षेत्र करंजी, वणी येथील जगदंबा माता, शिर्डीचे साईबाबा, शनि शिंगणापूर, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) तसेच पर्यटकांचे आकर्षण असलेल्या सापूतारा येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली दिसून येते.
याठिकाणी असलेले भक्तनिवास, हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली.चैत्रोत्सव आणि नवरात्र उत्सवात गडावर खाजगी वाहनांना बंदी असते. त्यामुळे गडावर वाहनांची कोंडी होत नाही. मात्र इतर वेळी वाहने थेट गडावर नेण्याची परवानगी असल्यामुळे गडावर खाजगी वाहनांची (Vehicles) मोठी गर्दी होऊन सप्तशृंगी घाटात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.
मुंबई, गुजरात, मध्यप्रदेश, जळगाव, उत्तर प्रदेश, धुळे, नंदुरबार या ठिकाणच्या भाविकांचा महापूर पाहायला मिळाला. तर फॅनिक्यूलर ट्राॅलीचा आनंद घेण्यासाठी अबाल वृद्धांनी गर्दी केली आहे. फनिक्यूलर ट्राॅलीत बसून दर्शनाला जाण्यासाठी भाविकांची प्रमाणापेक्षा अधिक गर्दी झाल्याने तेथेही चार ते पाच तास उशीर होत असल्याने भाविकांचा हिरमोड झाला. त्यामुळे भाविकांनी पायऱ्या चढून देवीचे दर्शन घेण्याचा निर्णय घेतला.दिवाळी सुट्टीनिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविक गडावर मोठ्या संख्येने येत आहेत. त्यामुळे व्यवसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.




