नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहर व परिसरात वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून (Police) शेकडो वाहनचालकांना अडवून चोरी-छुप्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या ‘वसुली’ चा एका व्हायरल व्हिडीओने पर्दाफाश केला आहे. पुणे महामार्गावर (Pune Highway) धुळे जिल्ह्यातील (Dhule District) एका वाहनचालकाकडून सीटबेल्टचा वापर न केल्यामुळे कारवाई करणाऱ्या पोलिसांसमक्ष एक रिक्षावाला ‘शंभराच्या पाच नोटा’ घेतो आणि वाहतूक पोलिसाच्या हाती टेकवितो, असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
श्रावण महिना सुरू असल्यामुळे नाशिकमधील (Nashik) त्र्यंबकेश्वर येथे भाविकांचा राबता वाढला आहे. अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, पुणे आदी जिल्ह्यांसह परराज्यांमधूनही भाविक नाशिकमध्ये दाखल होत आहेत. धुळे जिल्ह्यातील एका चारचाकी वाहनाच्या चालकाने सीटबेल्ट लावलेले नव्हते. त्यामुळे पुणे राेडवरील आंबेडकरनगरजवळ त्यास वाहतूक पोलिसाने रोखले. ‘दंडात्मक कारवाई करु’ असे सांगितले. त्याचवेळी चक्क एका रिक्षावाल्याने मध्यस्थीची सूत्रे हाती घेतली आणि वाहतूक पोलिसदादा तेथून दबक्या पावलांनी काही अंतर लांब गेले.
मग, संपूर्ण सेटलमेंट रिक्षावाल्याने (Rickshaw) हाताळून शंभर-दोनशे रुपयांत काय येतं…? दारूचे भाव किती वाढले…वगैरे असा संवाद साधून पाचशे रुपये द्यावे लागतील, असा दबाव टाकला. त्यामुळे संबंधित चालकाने शंभराच्या पाच नोटा मध्यस्थी रिक्षाचालकाच्या हाती दिल्या आणि नंतर त्याने पोलिसाला तेथे बोलावून घेतले. तोपर्यंत हा सगळा भ्रष्टाचार त्या जागरूक वाहनचालकाने त्याच्या खिशामध्ये ठेवलेल्या मोबाइलद्वारे चित्रित केला. यावेळी त्याने ‘नाशिकमध्ये ट्रॅफिकवाल्यांना असे पैसे द्यावे लागतात..’ असा संवादही ऐकू येतो.
दरम्यान, या सगळ्या प्रकाराने नाशिक शहर वाहतूक पोलिसांची (Nashik City Traffic Police) प्रतिमा मलीन झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातून काही भाविक नाशिक शहरातून त्र्यंबकेश्वरला जात होते. क्रुझर कारवर काही बॅगा बांधलेल्या दिसताच मुंबई नाका येथे उड्डाणपुलाखाली या जीपला पोलिसांनी रोखले. ओव्हरलोडच्या नावाखाली पुढील ‘कारवाई’ झाली असावी, असे बोलले जाते.
वसुली आली अंगलट
वाहतूक नियमाची कार्यवाही करण्याऐवजी रस्त्यालगत थांबून वाहतूक कोंडीत बेशिस्त वाहन चालक शोधून दंडात्मक कारवाई करणे पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगलट आले आहे. नियंत्रण कक्षातून वाहतूक कोंडी फोडण्याची सूचना मिळूनही कारवाईत मग्न राहिल्याप्रकरणी युनिट चारमधील चार कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे उपायुक्तांनी कारवाई केली आहे. त्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठविला आहे. सहाय्यक उपनिरीक्षक प्रकाश माळोदे, हवालदार भाऊसाहेब सांगळे, निलेश भोईर व अंमलदार विजय पाटील यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात वाहतूक पोलिसांची मनमानी सुरु असल्याने या घटनांतून दिसून येते आहे.




