नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.तानाजी चव्हाण तसेच डॉ. शेटे यांच्या चौकशीचे आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहे. डॉ. चव्हाण यांची बदली करून चौकशी करण्यात यावी तसेच डॉ. शेटे यांची चौकशी करून दोघांचा अहवाल पंधरा दिवसात शासनाकडे सादर करण्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेत खळबळ उडाली आहे.
आरोग्य आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली जाणार असून पुढील पंधरा दिवसात अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे. महात्मा नगर येथील डॉ . पंड्या हाॅस्पिटलमध्ये तपासणी दरम्यान गर्भपातासाठी आवश्यक गोळ्या औषधे सापडली होती. तसेच रुग्णालयने नुतनीकरणही केले नसल्याचे समोर आले होते. या प्रकरणी पंड्या रुग्णालयवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतू त्याबाबत हलगर्जीपणा केल्याचा आरोप आरोग्य अधिकारी डाॅ.चव्हाण व डाॅ.शेटे यांच्यावर झाले होते.
नूकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात हा मुद्दा गाजला होता. शिवसेना आ. मनीषा कायंदे यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यावर आरोग्यमंत्री आबिटकर यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार आज (दि.९)गुरुवारी शासनाने या प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश दिले. आरोग्य आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करुन पंधरा दिवसात अहवाल सादर करा अशा सूचना दिल्या आहेत. तसेच आरोग्य अधिकारी डाॅ.तानाजी चव्हाण हे मनपात प्रतिनियुक्तिवर आहेत. ती रद्द करुन त्यांना त्यांच्या मुळ सेवेत म्हणजे संदर्भ रुग्णालयात पाठवले आहे.