नाशिक | प्रतिनिधी | Nashik
ज्या समाजात आजही तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन उपेक्षेचा आहे, तिथे नाशिक ग्रामीण पोलीस भरतीच्या (Nashik Rural Police Bharati) मैदानात एका तृतीयपंथी उमेदवाराने आपल्या कर्तृत्वाने साऱ्यांची मने जिंकली आहेत. १६९२ पुरुष व महिला आणि तृतीयपंथी उमेदवारांच्या गर्दीत, या एका जिद्दीने मैदानी चाचणीत ५० पैकी तब्बल ३९ गुण पटकावून खाकी गणवेशाच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाकले आहे. ही केवळ एक शारीरिक चाचणी नव्हती, शतकानुशतकांच्या सामाजिक बेड्या तोडून मुख्य प्रवाहात येण्यासाठी मारलेली एक उत्तुंग झेप आहे.
तर नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या चालक पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या या चाचणीत एकूण २ हजार ६७५ उमेदवारांना (Candidate) पाचारण करण्यात आले होते. त्यापैकी १ हजार ७५४ उमेदवार प्रत्यक्षात हजर झाले. यामध्ये महिलांसोबतच तृतीयपंथीयांनाही (Transgender Candidate) संधी देण्यात आली. शारीरिक मोजमापात ६२ उमेदवार अपात्र ठरले, तर १ हजार ५४० उमेदवारांनी मैदानी चाचणीचा टप्पा गाठला.
या संपूर्ण प्रक्रियेत लक्ष वेधून घेतले ते एका तृतीयपंथी उमेदवाराने. या उमेदवाराने स्वतःची लिंग ओळख ‘महिला/तृतीयपंथी’ म्हणून निश्चित केल्यानंतर नियमानुसार ८०० मीटर धावण्याची चाचणी दिली. समाजाच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करत, पहाटेच्या दवबिंदूवर धावण्याचा सराव करत या उमेदवाराने मैदानी फेरीत ३९ गुण मिळवत ‘अशक्य काहीच नाही’ हे सिद्ध केले. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही भरती प्रक्रिया (Police Bharati) अत्यंत पारदर्शकपणे पार पडली.
ऐतिहासिक नोंद
नाशिक ग्रामीणच्या इतिहासात चालक पोलीस शिपाई पदासाठी एका तृतीयपंथीयाने मैदानी चाचणी यशस्वीपणे पार करण्याची ही महत्त्वाची घटना आहे. शारीरिक मोजमापाच्या निकषात ६२ जण बाद झाले असताना, या उमेदवाराने सर्व तांत्रिक निकष पूर्ण केले महिलांच्या निकषाप्रमाणे ८०० मीटर धावण्याच्या आव्हानावर मात करत ३९ गुणांची कमाई केली.
‘३९’ गुण.. सन्मानाची नवी सुरुवात!
या एका उमेदवाराच्या ३९ गुणांनी नाशिकच्या पोलीस मैदानात धूळ उडवली असली, तरी त्याचे खरे पडसाद समाजाच्या मानसिकतेवर उमटणार आहेत. जेव्हा हा उमेदवार खाकी वर्दी परिधान करून रस्त्यावर उतरेल, तेव्हा तो केवळ एक ‘पोलीस’ नसेल, तर आपल्या समाजातील हजारो तृतीयपंथीयांसाठी एक ‘आयडॉल’ असेल. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या भरती प्रक्रियेत दिलेल्या संधीमुळे ‘समानता’ ही केवळ कागदावर नसून ती मैदानातही उतरली आहे, हे स्पष्ट झाले.




