त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar
एकीकडे आपण जागतिक वसुंधरादिन साजरा करतो आणि दुसरीकडे जंगलाला आग लावण्याचे प्रकार सुरू आहेत. असेच दोन प्रकार त्र्यंबकेश्वरच्या (Trimbakeshwar) पर्वतरांगांमध्ये घडले आहेत. दोन्ही ठिकाणी मोठी आग लागून वनसंपदेबरोबर सरपटणारे प्राणी, कीटक यांना हानी पोहोचली. येथून तीन किलोमीटर अंतरावरील डोंगरावर सायंकाळी आग लागली. यात गवत, झाडेझुडपे यांचे मोठे नुकसान झाले.
वाळलेले गवत मोठ्या प्रमाणावर जळाले. येथील गौतम तलावाच्या पाठीमागे असलेल्या पंचलिंग डोंगर पट्ट्यातील डोंगराच्या कपारीला टोकावर उंचावर मोठी आग (Fire) लागली. सायंकाळी वारा सुटल्याने उंचीवरून गवत पेटून आगेच्या ठिणग्या उडताना दिसत होत्या. त्यामुळे आग लवकर पसरली. रिंगरोडवरून ही आग दिसत होती. दोन्ही आगीच्या घटनांकडे नागरिकांनी सोशल मीडियातून वन विभागाचे लक्ष वेधले आहे. वनविभागाचे कायम दुर्लक्ष असते असा आरोप करीत धूमोडी येथील रामदास आहेर यांनी चिंता व्यक्त केली.
दरम्यान, त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी परिसरावर यापूर्वी नगरपालिकेने (Municipality) वृक्ष लागवडीवर मोठा खर्च केला होता. पण एकही वृक्ष जगले नाही यांची आठवण करून देतानाच नद्यांची छेडखानी होत आरोप करत पालिका वसुंधरा दिनाच्या उद्दिष्टांपासून दूर असल्याची खंत नागरिकांनी बोलून दाखवली. काहींनी आगेच्या प्रकाराबाबत तहसील कार्यालयाचे लक्ष वेधले. वनविभाग व ग्रामस्थांच्या मदतीने डॉगरावरील आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. जव्हार रोडवरील डोंगरावरील लागलेली आग विझविण्यासाठी वनविभाग व ग्रामस्थांनी प्रयत्न केले. परिसरातील युवकांनी झाडांच्या फांद्याचा मारा करत गवत वाचवले.
वणव्याचे नैसर्गिक कारण
उष्णतेच्या लाटांमुळे जंगलातील गवत, पाने, आणि लाकडे कोरडे होतात, ज्यामुळे आग लागण्याची शक्यता वाढते. आपल्या राज्यात उष्ण हवामान आणि कमी पर्जन्यमानामुळे वणव्यांचा धोका अधिक असतो.
मानवी कारणे
जंगलात किंवा शेतात फेकलेली सिगारेट किंवा विडी, शिकार किंवा पर्यटनादरम्यान केलेली निष्काळजी कृती यामुळे आग लागू शकते. विशेषतः उन्हाळ्यात या कारणांमुळे वणव्यांची शक्यता अधिक असते. अनेक शेतकरी शेतातील अवशेष जाळतात. त्यातून कधी कधी आग नियंत्रणाबाहेर जाऊन जंगलात पसरते आणि मोठा वणवा तयार होतो. अवैध शिकार आणि लाकूडतोड करणारे लोक. शहरीकरण आणि जंगलात बांधकाम.