Thursday, October 22, 2026
HomeनाशिकNashik ZP News : नाशिक ते नासा! १५ हजार विद्यार्थ्यांमधून निवडले जाणार...

Nashik ZP News : नाशिक ते नासा! १५ हजार विद्यार्थ्यांमधून निवडले जाणार १०५ ‘ज्ञानयात्री’; स्कॉलरशिपची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंद वार्ता

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा परिषद नाशिकच्या (Zilla Parishad Nashik) ‘मिशन स्कॉलरशिप’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘ज्ञानयात्री’ या अभिनव शैक्षणिक सहल उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि लोकशाही संस्थांचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी इयत्ता ७ वीच्या सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांची विशेष निवड परीक्षा घेण्यात येणार असून, गुणवत्तेच्या आधारे १०५ विद्यार्थ्यांची (Student) अंतिम निवड केली जाणार आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा परिषदेत आयोजीत पत्रकार परिषदेत माहिती दिली.

- Advertisement -

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार (Omkar Pawar) यांनी ‘ज्ञानयात्री’ उपक्रमाची संकल्पना, निवड प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक अनुभवांची सविस्तर माहिती दिली. ‘ज्ञानयात्री’साठी निवड परीक्षा गट स्तरावर तसेच जिल्हा स्तरावर घेण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातून गुणवत्तेच्या आधारे ७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून, जिल्ह्यातील १५ तालुक्यांतून एकूण १०५ विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाणार आहे. या परीक्षेसाठी १०० गुणांची प्रश्नपत्रिका असून, परीक्षेचा कालावधी १२० मिनिटांचा असेल. ऑक्टोबर महिन्याच्या (Month) पहिल्या आठवड्यात ही परीक्षा आयोजित करण्यात येणार असून, परीक्षा (Exam) मराठी आणि उर्दू या दोन्ही माध्यमांतून घेण्यात येणार आहे.

१०५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुभव 

निवड झालेल्या १०५ विद्यार्थ्यांचे तीन गट करण्यात येणार असून, प्रत्येक गटाला वेगळा आणि विशेष शैक्षणिक अनुभव मिळणार आहे. अमेरिकेतील नासा या जगप्रसिद्ध अवकाश संशोधन संस्थेला भेट देऊन विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञान, संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संस्था इस्रोला भेट देऊन भारतीय अवकाश संशोधन, उपग्रह तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक प्रगतीची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून मिळणार आहे. नवी दिल्ली येथे संसद भवनासह विविध महत्त्वाच्या शैक्षणिक व लोकशाही संस्थांना भेट देत विद्यार्थ्यांना भारतीय लोकशाही व्यवस्था आणि संसदीय कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये क्षमता विकसित करणे हा प्रमुख उद्देश

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा, प्रश्न विचारण्याची वृत्ती, निरीक्षणशक्ती आणि विश्लेषणात्मक क्षमता विकसित करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. वर्गखोलीतील शिक्षणाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड देत विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील संधी विद्यार्थ्यांना जवळून समजाव्यात, तसेच देशाच्या लोकशाही संस्थांच्या कार्यपद्धतीची ओळख व्हावी, यासाठी या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. ‘स्थानिक प्रतिभेला आंतरराष्ट्रीय संधींची जोड’ या संकल्पनेतून राबविण्यात येणारा हा उपक्रम जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती साकार करण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा देणार आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता केवळ परीक्षेपुरती मर्यादित न राहता त्यांना प्रत्यक्ष अनुभव, प्रेरणा आणि व्यापक संधींची दारे खुली व्हावीत, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.

सीईओ ओमकार पवार काय म्हणाले?

मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी सांगितले की, जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्ता आणि प्रतिभेची कमतरता नाही. योग्य संधी, मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष अनुभव मिळाल्यास विद्यार्थी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या क्षमतेचा ठसा उमटवू शकतात. ‘ज्ञानयात्री’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना अनुभवाची आणि संधीची जोड देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.‘नाशिक ते नासा’ हा केवळ शैक्षणिक दौरा नसून, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना व्यापक संधींच्या विश्वाशी जोडणारा अनुभव आहे. NASA, ISRO आणि संसद भवन या तीन वेगवेगळ्या अनुभवविश्वातून विद्यार्थ्यांना विज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान आणि लोकशाहीची प्रत्यक्ष ओळख करून देत त्यांच्या ज्ञानविश्वाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, सहायक जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आडे, शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

पडसाद : दादा, जरा शिक्षण खात्याकडेही लक्ष द्या!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे संपूर्ण राज्यभर नाशिकच्या शिक्षण विभागाच्या कारनाम्यांची लक्तरे वेशीवर टांगली जात असतांनाही हे खाते...