बेलगाव कुऱ्हे | वार्ताहर | Belgaon Kurhe
पावसाचे माहेरघर म्हणून मिरवणाऱ्या इगतपुरी तालुक्यात (Igatpuri Taluka) उन्हाळ्याच्या झळा अधिक वाढल्या असून अनेक ठिकाणी पाणी टंचाईचे सावट दिसत आहे. इगतपुरी तालुक्यात एकूण १२ छोटे मोठे धरण असून, धरणात देखील पाणीसाठा (Water Storage) कमी झाल्याचे चित्र दिसत आहे.
दारणा धरणात (Darna Dam) ३५.१५, भावली २४.४ तर भाम धरणात केवळ १५. ९१, कडवा १७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. इगतपुरी तालुक्यात उन्हाळ्याची (Summer) कोरडी छाया नागरीकांची तडफड वाढवत आहे. पाण्याचा ठणठनाट जीवघेणा बनू लागला आहे. सावली नाही चारा नाही तहान भागवायला पाणी नाही अशी परिस्थिती मुक्या जनावरांवर येऊन ठेपली आहे. पाण्याअभावी काही शेतकऱ्यांची पिकेही सुकून गेली आहेत.
तालुक्यातील लहान मोठ्या धरणांची पाणी पातळी खालावली असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आता धरणाच्या तालुक्याला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यात पिण्याचे पाणी व चारा टंचाई यावर चर्चा बैठका नियोजन अजून झालेले नाही. राजकीय नेते उदासीन आहे. प्रश्नांच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. पाणी बचतीसाठी कठोर धोरण अवलंबवावे लागणार आहे.
तसेच तालुक्यातील पशुधन वाचविण्यासाठी उपयोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. उन्हाच्या तापमानामुळे मका या पिकाचा पाला पाचोळा झाला आहे. पावसाचे (Rain) आगार समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील अनेक गावे पिण्याच्या पाण्यावाचून होरपळत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करीत आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे.
दरम्यान, सूर्य आग ओकत असून उन्हामुळे सर्वच गावांमध्ये दुपारच्या वेळी अघोषित संचारबंदीचे चित्र निर्माण झाले असल्याचे दिसते. कोपरगाव येथील पाण्याची निकड ओळखून इगतपुरी तालुक्यातील दारणा धरणातील पाणी कोपरगावला (Kopargaon) सोडण्यात आले. अकाली सोडलेले आवर्तन इगतपुरी तालुक्याला अलाभदायी ठरलेलं असून शेतात उभे पिकांची (Crop) चिंता ठाकली आहे.
इगतपुरी तालुक्यात धरणांचे पाणी आरक्षित असतांना देखील कडवा धरण, दारणा, मुकणे, भावली कोरपगाव ह्या धरणांचे पाणी येवला, कोपरगाव, सिन्नर येथे बलाढ्य नेत्यांनी इगतपुरी तालुक्यातील धरणे सर्वच कोरडी केली. मात्र इगतपुरीतील नेते मंडळी कधीच कुठे आरक्षित पाण्याबाबत आवाज उचलताना दिसत नाही. दारणाच्या पावर हाऊसजवळून कोपरगावकडे आवर्तन सोडले. अहिल्यानगरचे काही राजकीय नेते ह्या जिल्ह्याकरिता पाणी पळवून नेत आहेत. धरणे कोरडे करण्याचा सपाटा सुरू असून लोकांच्या डोळ्यासमोर पाणी जात आहे. प्रशासनाने पाणी समस्यांकडे लक्ष दयावे.
दादाभाऊ शिरसाठ, माजी चेअरमन नांदगाव बुद्रुक