दिंडोरी | नितीन गांगुर्डे | Dindori
सप्तशृंगगडावर (Saptashrung Gad) दोन दिवसांपूर्वी उसळलेल्या गर्दीनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले असून गडावर चैत्र पौर्णिमा (Chaitra Purnima) उत्सवाची सांगतावेळी गर्दी आणि पाणीटंचाईचे फेरनियोजन होणे गरजेचे आहे. गडावर आतापासूनच पाणीटंचाईचे (Water Shortage) गडद सावट आहे.
सप्तशृंगगडावर चैत्र पौर्णिमा उत्सव उत्साहात सुरु आहे. खान्देशातील (Khandesh) भाविक मोठ्या संख्येने गडावर दाखल होत आहेत. जळगाव, भुसावळ, धुळे, सटाणा, मालेगाव, अमळनेर, साक्री, चोपडा आदी भागातून मोठ्या संख्येने भाविक येत आहे. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी गडावर भक्तांचा महापूर निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर गडावर कोणतीही दुर्घटना होवू नये व भाविकांनाही सुलभ दर्शन घेता यावे, यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करण्याची गरज आहे. विशेषतः अफवांचे पीक पसरवू नये, यासाठी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. दर्शन रांगेत पायऱ्यांवर प्रचंड गर्दी होत असल्याने टप्याटप्याने भाविकांना सोडत आहे.
भाविकांची गर्दी (Crowd of Devotees) पाहता गर्दीत अनेक हौशे राहतात. त्यामुळे तेथे थोडीफार धक्काबुक्कीची शक्यता असते. अशावेळी ठिकठिकाणी गडावरील पायऱ्यांवर ठराविक अंतराने धावपळ होवू नये किंवा लोटालोटी होवू नये, यासाठी पोलीस यंत्रणा व जास्त सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे आहे. त्याचबरोबर भाविकांचे सुध्दा माईकद्वारे गोंधळ न करण्याचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. सध्या गडावर पाणी टंचाईचे सावट दिसून येत आहे. टँकरने पाणीपुरवठा होत आहे. जे टँकर सुरु झाले ते उशिरा सुरु झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गडावर पुरेसा पाणीसाठा उपलब्ध करण्याची काळाची गरज आहे. गडावर पूर्वीपासून १०८ कुंड होते, असे म्हटले जाते. यातील काही कुंड दिसतात तर अनेक कुंडांचा शोध घेतल्यास काही अंशी पाणीपुरवठ्याला मदत होवू शकते काय? याची चाचपणी करता येईल. सध्या गर्दी पाहता भाविकांना पिण्याच्या पाण्याचा बाटल्या विकत घेवून तहान भागवावी लागत आहे. लाखो रुपयांची उलाढाल पाण्याच्या बाटली विक्रीतून झाली आहे. तेवढीच उलाढाल शीतपेय विक्रीतून होत आहे. रणरणत्या उन्हात भाविकांना पाण्याची गरज भासत आहे. सर्व सामान्य भाविक टैंकर अथवा अन्य स्त्रोतातून पाणी घेत आहेत.
भाविकांसह ग्रामस्थांना भर यात्रेत पाण्यासाठी (Water) वणवण करावी लागत आहे. त्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्ती जागी होऊन सप्तशृंगगडाला कधी पाझर फुटले? असा प्रश्न भाविक उपस्थित करतांना दिसत आहेत. कळवण तालुक्यातील सप्तशृंगी देवीच्या पायथ्याशी वसलेले सप्तशृंगी गाव महाराष्ट्रात धार्मिक स्थळावर हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे देशाचे विविध भागांमधून पर्यटन पर्यटकांचा राबता गडावरती असतो असे असले तरी गावात पर्यटकांच्या आणि भाविकांच्या दृष्टीने पायाभूत सुविधा उपलब्ध उपलब्ध होणे गरजेचे आहे.
सप्तशृंगगड परिसर संपूर्ण डोंगराई हिरवाईने नटलेला परिसर असल्याने या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. मात्र, साठवणुकीसाठी असलेल्या तलावामध्ये गळती होत असल्याने उन्हाळ्यात पाण्याच्या समस्येंला तोंड द्यावे लागत आहे. भाविकांना सध्या पाणी विकत घेवून आपली तहान भागवावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे. सूर्य आग ओकत असताना भाविक पायी येतात, पण पाणी नसल्याने जीवाची लाही लाही होत असल्याने पाण्याची सोय करणे गरजेचे आहे. एकंदरीत गडावर चैत्रोत्सवाच्या शेवटच्या पर्वात गर्दी व पाणी नियोजन करणे गरजेचे आहे.
सप्तशृंगगडावर चैत्रोत्सव सुरू आहे. येणाऱ्या भाविकांना विकतच पाणी घ्यावे लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत संबंधित विभागाने पाणीसाठा उपलब्ध राहणार असल्याचे सांगितले होते. परंतु गावाला व देवीभक्तांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
■ भूषण देशमुख, ग्रामस्थ, सप्तशृंगगड
सप्तशृंगगड हे महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एक महत्त्वाचे श्रद्धास्थान असून या ठिकाणी वर्षातून दोनदा यात्रा भरते, यात्रेला खान्देशासह देशातील भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. परंतु संबंधित यंत्रणा योग्य पाणी नियोजन करत नसल्याने मोठ्या प्रमाणात देवीभक्तांसह गावकऱ्यांचे हाल होतात.
■ प्रकाश कडवे, जिल्हा सरचिटणीस, भाजप