नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गेल्या कित्येक दशकांपासून जेलरोड (नाशिकरोड) ची मुख्य ओळख असलेली, ऊन-वारा-पाऊस झेलत ताठ मानेने उभी राहिलेली आणि हजारो घरांची तहान भागवणारी व जेलरोडची लँडमार्क म्हणून ओळखली जाणारी ‘पाण्याची टाकी’ (Water Tank) अखेर जमीनदोस्त करण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ही टाकी पाडण्यात आली.
सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने ही वास्तू पाडली असली, तरी जेलरोडकरांसाठी हा केवळ एक सिमेंटचा (Cement) साचा नव्हता, तर त्यांच्या आयुष्यातील आठवणींचा एक जिवंत कप्पा होता. ही टाकी पाडली गेल्याने तेथील जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
केवळ वास्तू नाही, तर दिशा दाखवणारा ‘बुरुज’
नाशिकरोड किंवा जेलरोड परिसरात (Nashik Road and JailRoad) येणाऱ्या प्रत्येकाला दिशा दाखवणारा हा एक मुख्य ‘लँडमार्क’ होता. “टाकीजवळ भेटू…” हे वाक्य या भागातील तरुणाईपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाच्या संवादाचा एक अविभाज्य भाग होते. शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते संध्याकाळी गप्पा मारणाऱ्या मित्रांपर्यंत, अनेकांच्या शेकडो भेटींचे आणि सुख-दुःखाच्या संवादांचे हे मुख्य केंद्र होते.
ऋणातून मुक्त झालेली ‘माऊली’
कित्येक वर्ष अविरतपणे सेवा देणारी ही पाण्याची टाकी जेलरोडकरांसाठी एखाद्या माऊलीसारखीच होती. पिढ्यानपिढ्या लोकांची तहान भागवत तिने आपले कर्तव्य चोख बजावले. वाढत्या वयासोबत या भागाचा झालेला विकास आणि बदल या टाकीने अगदी जवळून पाहिला होता.
नागरिकांची भावना
टाकी जमीनदोस्त झाल्यानंतर नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, ” आता त्या जागेकडे बघताना छातीत धस्स झाल्यावाचून राहत नाही. तिथे आता फक्त एक मोठी पोकळी आणि शांतता उरली आहे. काळ बदलला, सुरक्षेसाठी ती पाडणे गरजेचेही असेल, पण जेलरोडच्या हृदयातून या पाण्याच्या टाकीचे स्थान कधीच पुसता येणार नाही. तसेच काळ बदलतो, जुन्या गोष्टी जातात आणि त्यांच्या जागी नव्या वास्तू उभ्या राहतात हा निसर्गाचा नियम असला, तरी जेलरोडच्या इतिहासातील हे एक सुवर्णपान आता कायमचे मिटले आहे,असेही काहींनी सांगितले.




