नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मुंबई-पुणे-नाशिक (Mumbai-Pune-Nashik) असा सुवर्ण त्रिकोण तयार झाल्याने नाशिकचा (Nashik) झपाट्याने विकास होत आहे. तर शहरात विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या निओ मेट्रो, आयटी पार्क तसेच लॉजेस्टिक पार्क इत्यादी प्रकल्प त्वरित मार्गी लागणे गरजेचे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी विशेष लक्ष दिल्यास नाशिककारांना हे महत्त्वाचे प्रकल्प मिळू शकतात. मनपाचे वरिष्ठ अधिकारी अतिरिक्त उपायुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे यांच्यासह अधिकाऱ्यांच्या पथकाने मागच्या आठवड्यातच नागपूरला जाऊन राज्याच्या सचिवांना याबाबतचे सादरीकरण केले आहे. मात्र अद्याप याबाबत शासनाकडून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही.
२०१७ साली झालेल्या नाशिक मनपाच्या निवडणुकीत (Nashik NMC Election) भाजपचे तब्बल ६६ नगरसेवक निवडून आले होते तर मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपची एकहाती सत्ता आली होती. या पाच वर्षांच्या काळात मनपाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणत विकासकामांचे भूमिपूजन झाले होते. मात्र, २०१९ साली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने अनेक कामांना ब्रेक लागले होते. आता पुन्हा राज्यात भाजपचे मुख्यमंत्री झाले असून मनपाच्या भाजपकाळातील कामांना मुहूर्त लागण्याची शक्यता वाढली आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर बहुचर्चित आयटी व लॉजेस्टिक पार्क, सिंहस्थाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण नमामि गोदा या प्रकल्पांना चालना देण्यासाठी मंत्रालय सचिवांनी मनपाच्या अधिकाऱ्यांना नागपूरला बोलावले होते. नागपूरला हिवाळी अधिवेशनात तर भाजप आमदार सीमा हिरे यांनीदेखील या रखडलेल्या प्रकल्पांबाबत आवाज उठवला होता. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत हे प्रकल्प मार्गी लावले जातील, असे आश्वसनदेखील दिले आहे.