नाशिक | Nashik
घरातील (House) रद्दी आणि अनावश्यक फाईल्स आगीत जाळतांना गंभीररित्या होरपळलेल्या दाम्पत्यापैकी पत्नीचा सहा दिवसांच्या उपचारानंतर मृत्यू (Death) झाला आहे. सरोज रामभूल वाल्मिकी (वय ४६, रा. कला रो हाऊस, बुद्ध विहाराजवळ, श्रमिकनगर, सातपूर) असे मृत महिलेचे नाव आहे. तर, पती रामभूल सौदनसिंग वाल्मिकी (वय ५०) यांच्यावर उपचार सुरु आहेत.
वाल्मिकी दाम्पत्य हे शुक्रवारी (दि. ३१) घरी असताना सरोज यांनी घराची साफसफाई करुन निघालेला कचरा, रद्दी व फाईल्स जाळण्याच्या प्रयत्न केला. सरोज यांनी फाईल्स जाळल्या असता, त्यांच्या ओढणीने अचानक पेट घेतला. ही घटना पाहताच, पत्नीच्या बचावासाठी रामभूल सरसावले. त्यांनी आग (Fire) विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र ते देखील होरपळले. तेव्हा सरोज यांच्या ओढणीसह ड्रेसनेही पेट घेतल्याने त्या ४० टक्के भाजल्या गेल्या.
दरम्यान, ही घटना नातलग व इतरांना कळताच त्यांनी आग शमवून भाजलेल्या दाम्पत्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात (District Government Hospital) उपचारार्थ दाखल केले. दरम्यान, दोघांवर शर्थीचे उपचार केले जात असतानाच, सरोज यांचा बुधवारी (दि. ५) मृत्यू झाला आहे. तर, त्यांच्या पतीवर उपचार सुरु आहेत. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेने सातपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.