नाशिक | Nashik
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी (Sant Nivruttinath Maharaj Palkhi) सोहळ्यात त्र्यंबकेश्वरहून (Trimbakeshwar) सहभागी झालेल्या एका वृद्ध वारकरी महिलेचे आज (सोमवारी) पहाटे अहिल्यानगर येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. सुमनबाई मधुकर कांडेकर (वय ६५, सध्या रा. तळेगाव अंजनेरी, ता. त्र्यंबकेश्वर) असे या मृत वारकरी माऊलीचे नाव आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण निवृत्तीनाथ महाराज दिंडी सोहळ्यात आणि वारकरी वर्गात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संत निवृत्तीनाथ महाराज दिंडी सोहळा सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात (Ahilyanagar District) मार्गक्रमण करत आहे. सोमवारी (दि.१३) रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास सुमनबाई यांना झोपेतच हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष राहुल महाराज साळुंखे आणि विश्वस्त नवनाथ गांगुर्डे यांनी तात्काळ अहिल्यानगरच्या शासकीय रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी तेथील परिस्थितीची पाहणी करत पुढील आवश्यक बाबींसाठी मदत केली. यानंतर रुग्णालयात (Hospital) कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह (Dead Body) त्यांच्या गावाकडे पाठविण्यात आला आहे.




