खोकरविहीर | देवीदास कामडी | Khokar Vihir
पेठ तालुक्यातील (Peth Taluka) खिरोणापाडा ग्रामपंचायतीत (Khironapada Gram Panchayat) असलेल्या डोल्हारमाळ पाड्यात महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. खिरोणापाड्यात यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाई जाणवत आहे. गावात पाण्यासाठी दोन विहिरी असून डोंगरावर ग्रामपंचायतीची एक विहीर असून, डोंगराच्या पायथ्याशी दुसरी विहीर आहे. तेथून काही अंतरावर डोह असून तेथून टप्प्याने पाणी उचलून विहिरीत टाकावे लागते.
वीजपुरवठा (Power Supply) नसल्याने आदिवासी बांधव दर तीन-चार दिवसांनी तीन-चार हजार रुपयांची पदरमोड करून डिझेल इंजिन चालवून मोटारीने डोहाचे पाणी उपसून विहिरीत टाकतात. त्या विहिरीतून वर पाणी येत नसल्यामुळे खिरोणापाड्यातील महिला विहिरीतील पाणी उपसण्यासाठी गावापासून एक किलोमीटर अंतरावर रात्री-बेरात्री पायपीट करून पाणी भरत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या कधी सुटेल, असा प्रश्न आदिवासींना पडला आहे.
पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून सतत ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. गावाची तहान भागवण्यासाठी पाणीपुरवठा विभाग लक्ष देईना. जसजसे ऊन वाढत आहे तसतसे गावातील (Village) महिलांना पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. डोंगर पायथा ते खिरोणापाडा ही पाईप जलवाहिनी जलजीवन योजनेत व्हावी, यासाठी ग्रामस्थांनी पाठपुरावा केलेला आहे. आदिवासी भागात सध्या कामधंदा नसल्याने तेथील आदिवासी नाशिक जिल्ह्यात (Nashik District) इतरत्र कामाच्या शोधात गेलेले आहेत.
मात्र, वृद्ध, महिला पाड्यात असल्याने त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आलेली आहे. अशा गावांना दरवर्षी ट्रैकरद्वारे पाणीपुरवठ्चाबर मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात येतो परंतु गावाला पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याची ओरड आदिवासी बांधवांमध्ये (Tribal Brothers) आहे. खिरोणापाडासारखी अनेक गावे, पाडे यांचा शासनस्तरावर विचार व्हावा आणि अशा गावांची कायमस्वरूपी पाणी समस्या दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे.
जंगलातून पायपीट
खिरोणापाडा गावात पाणीप्रश्न सोडवण्यासाठी दरवर्षी प्रत्येक घरामागे एकूण १०० रुपये वर्गणी काढून डिझेल मशीनद्वारे पाझर तलावातील दूषित पाणी विहिरीमध्ये टाकले जाते. यामुळे ग्रामस्थांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. ही विहीरही गावापासून ५०० मीटर अंतरावर आहे. तेथे जाण्यासाठी मुली, महिला जंगलातून जातात. यामुळे जंगली जनावरांची भीती आहे.
‘देशदूत’ विविधातील लेखामुळे दखल
डोल्हारमाळ ग्रामपंचायतीअंतर्गत खिरोणापाडासारखे अनेक पाडे येतात. ग्रामपंचायतीला पाणी सुविधा करण्यात येते; परंतु अशा ग्रामपंचायतीमधील पाडे, वाड्या पाणीटंचाईग्रस्त बघावयास मिळतात. यावर दैनिक ‘देशदूत’ने विविधा पुरवणीतून प्रकाशझोत टाकला होता, त्याची दखल घेत यंत्रणेने त्या भागात पाहणी करून उपाययोजना करण्यास हालचाल सुरू केलेली आहे.