नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरात वाढत असलेली पार्किंग (Parking) समस्या दूर करण्यासाठी मनपाने पुढाकार घेतला असून पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्ये (Nashik) पार्किंग झोन तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे साडेचार हजार वाहने पार्क होतील या पद्धतीने पहिल्या झोनच्या (Zone) कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शहरातील वाहतूककोंडी फोडण्याबरोबरच वाहनधारकांना शिस्त लागावी यासाठी महापालिकेच्या (NMC) वाहतूक सेलकडून पुणे शहराच्या धर्तीवर स्मार्ट पार्किंग उभारली जात आहे. २९ ठिकाणी होणाऱ्या या पार्किंगसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरात पार्किंग झोन तयार करण्यात येत आहेत. पहिल्या झोनचे काम पूर्ण झाल्याने निविदा काढली गेली आहे. सुमारे ६ चौरस किलो मिटरप्रमाणे झोन तयार करण्यात आला आहे. स्मार्ट पार्किंग राबवताना संबंधित ठेकेदाराकडे टोईंगचेही अधिकार असणार आहे.
दरम्यान, याबाबत शहर पोलीस दलाने (City Police Force) देखील होकार दिला आहे. यामुळे वाहने कुठेही रस्त्यावर लावलेले आढळून आल्यास टोईंगद्वारे कारवाई केली जाणार आहे. या कारवाई वेळी वाहतूक शाखेचा एक कर्मचारीही असणार आहे. महापालिकेच्या वाहतूक सेलकडून गेल्या वर्षापासून स्मार्ट पार्किंगवर काम सुरु आहे. अखेर यास मूर्त स्वरुप आले आहे. १० जुलैपर्यंत इच्छुक यात भाग घेणार आहे. यानंतर निविदा खुली करुन ठेका देण्यात येणार आहे. त्यामुळे जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शहरात प्रत्यक्ष काम देखील सुरू होणार आहे.
असा आहे पहिला झोन
शहरातील महात्मानगर, सिटी सेंटर मॉल, गंगापूररोड परिसरात पहिला झोन असेल. त्यात २२ ऑन स्ट्रीट व सहा ऑफ स्ट्रीट पार्किंगच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यात सुमारे साडेचार हजार चारचाकी वाहने पार्क होतील अशी व्यवस्था राहणार आहे.
पुणे पॅटर्नचा अभ्यास
काही दिवसांपूर्वी पुणे येथील इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्टेशन अॅण्ड डेव्हलपेंट पॉलिसी (आयटीडीपी) या संस्थेने नाशिक शहरातील प्रमुख वर्दळीच्या भागात पार्किंग आणि वाहतूककोंडीचा अभ्यास केला होता. त्याचा अहवाल या संस्थेने मनपाला दिला आहे. नाशिकच्या पथकानेही पुणे महापालिका हद्दीतील स्मार्ट पार्किंगचा अभ्यास केला होता. त्यामुळे पुणे पॅटर्नप्रमाणे नाशिकमध्ये पार्किंगची सोय राहणार आहे.
स्मार्ट पार्किंगद्वारे वाहने पार्क करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. यातून महापालिकेला महसूलही मिळणार आहे. तर शहरातील वाहतुकीला शिस्त लागेल. नो पार्किंगमध्ये वाहने लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसाठी ठेकेदाराने नियुक्त केलेले कर्मचारी, वाहतूक शाखेचा कर्मचारी दक्ष असेल.
प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त, मनपा





