Sunday, April 26, 2026
Homeक्राईमNashik News : पाइप अंगावर पडल्याने कामगाराचा मृत्यू

Nashik News : पाइप अंगावर पडल्याने कामगाराचा मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) पाइपलाइन दुरुस्तीच्या कामात सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याचा एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पंचवटीतील संभाजी चौक परिसरात पाइप उतरवत असताना, अवजड लोखंडी पाइप अंगावर कोसळल्याने २२ वर्षीय मनोज कुमार वैजनाथ पनिका या तरुण कामगाराचा दबून जागीच मृत्यू (Death) झाला. या घटनेने महापालिकेचे रस्ते आणि पाणीपुरवठा विभागातील कंत्राटदारांच्या मनमानी कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

- Advertisement -

मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी असलेला मनोज कुमार हा खोपोली येथून नाशिक महापालिकेच्या कामासाठी (Work) ‘एमएस पाइप’ (लोखंडी पाइप) घेऊन एमएच ४६ सीयू ६१८६ क्रमांकाचा ट्रक घेऊन आला होता. शुक्रवारी (दि. २७) सायंकाळच्या सुमारास तारवालानगर येथील संभाजी चौकात हे पाइप उतरविण्याचे काम सुरू झाले. पाइप प्रचंड अवजड असतानाही कंत्राटदाराने तिथे कोणतीही क्रेन किंवा सुरक्षेची आधुनिक साधने उपलब्ध करून दिली नव्हती.

मनोज स्वतः ट्रकवर चढून पाइप उतरविण्यास मदत करत असताना, अचानक एक पाइप निसटला आणि थेट मनोजच्या अंगावर पडला. या वजनाखाली मनोज पूर्णपणे दाबला गेला आणि तो जागीच बेशुद्ध पडला. कंत्राटदाराकडून कामगारांना हेल्मेट, जॅकेट किंवा कोणतेही सुरक्षा गियर देण्यात आले नव्हते. नाशिक महापालिकेच्या नियमानुसार, कोणत्याही धोकादायक कामाच्या ठिकाणी ‘सेफ्टी ऑडिट’ होणे गरजेचे असते, मात्र येथे या नियमांना केराची टोपली दाखवण्यात आली.

प्रशासकीय हलगर्जीपणावर संताप

अपघातानंतर मनोजला दशरथ अर्जुन डावरे यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर दुखापत झाल्याने रात्री उशिरा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. पंचवटी पोलिसांनी पंचनामा केला. पोलिसांनी सध्या या प्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे. मात्र, प्राथमिक तपासात कंत्राटदाराचा हलगर्जीपणा उघड होत असल्याने, त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा किंवा निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. महापालिका प्रशासन आता संबंधित कंत्राटदारावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव ?

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक 1300 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समिती कांद्याची (Onion) 3196 गोण्यांची...