नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नववर्षातील पहिला सण म्हणून मकरसंक्रांत (Makar Sankrant) साजरा केला जातो. यानिमित्ताने लहान मोठ्यासंह सर्वजण पतंग उडविण्याचा आनंद घेत असतात. नाशिक शहरात (Nashik City) देखील सकाळपासून बालगोपाळांसह सर्वजण डीजेच्या तालावर पतंग उडविण्याचा आनंद घेत आहेत. मात्र, अशातच पतंगाच्या नायलॉन मांजामुळे शहरातील पाथर्डी फाटा परिसरात (Pathardi Phata Area) एकाचा गळा कापून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोनू किशोर धोत्रे (वय २३, राहणार चारणवाडी, देवळाली कॅम्प, नाशिक)
असे नायलॉन मांजामुळे गळा कापून मृत्यू (Death) झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आज सकाळी धोत्रे हा पाथर्डी फाटा येथून वडनेर रोड मार्गे दुचाकीवरून कंपनीत जात असताना नायलॉन मांजामुळे गळा कापल्या गेला.
दरम्यान, त्यानंतर लगेचच त्याला जिल्हा शासकीत रुग्णालयात (District Government Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस (Indiranagar Police) पुढील तपास करीत आहेत.