इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri
शहरातील बारा बंगला परिसरातील नगरपरिषदेच्या तलवात (Lake) पोहण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कार्तिक रमेश परदेशी, रा. ग्रीनशॉप, बारा बंगला रोड, इगतपुरी असे मृत झालेल्या युवकाचे (Youth) नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक रमेश परदेशी हा शुक्रवार (दि.१३) रोजी घरात कोणालाही न सांगता त्याच्या मित्रांसोबत फिरण्यासाठी बारा बंगला तलाव परिसरात गेला होता. यावेळी तलावाजवळ आल्यानंतर त्याला पोहण्याचा मोह आवरता आला नाही. त्याने तलावात पोहण्यासाठी उडी मारली मात्र पाण्याच्या (Water) खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस कर्मचारी, नगरपरिषद कर्मचारी यांनी शोधमोहीम सुरू केली. त्यावेळी तलावाच्या कडेला कार्तिकच्या अंगातील कपडे व हातातील कडे दिसून आले. यावरून त्याचा शोध पाण्यात घेण्यासाठी स्थानिक युवकांनी पाण्यात शोध घेण्याचे काम सुरू केले. कार्तिकचा गेल्या दोन दिवसांपासून शोध सुरू होता. अखेर शनिवार दि. १४ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पाणबुड्यांच्या मदतीने शोध घेत असतांना कार्तिकचा मृतदेह (Dead Body) तलावातून बाहेर काढण्यात आला.
दरम्यान, यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला होता, ग्रामिण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. निलम लिलके यांनी युवकाला मयत घोषित केले. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात (Igatpuri Police Station) अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सारीका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी, गोपनिय पोलीस निलेश देवराज, पोलीस कर्मचारी विजय रूद्रे आदी पोलीस पथक करीत आहे.





